“९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:03 IST2025-02-07T15:58:31+5:302025-02-07T16:03:46+5:30
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटाच एवढा आहे की, त्यांना कुठलेही मिशन राबवण्याची गरज नाही, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

“९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारूण पराभव झाला. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. परंतु, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. यातच पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो, शिंदे गटात मोठे पक्षप्रवेश होऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे.
अलीकडेच शिंदे गटाच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण राबवणार असून, ठाकरे गटाचे आमदार, खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असून, लवकरच त्याबाबत निर्णय होणार असल्याचा दावा केला. परंतु, गेल्या काही दिवसांतच राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असून, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. याबाबत ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला गेला होता. याबाबत हा दावा खोटा असल्याचे सांगत ठाकरे गटाच्या खासदारांनी एकजूट दाखवली. या घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सूचक प्रतिक्रिया देत पुढे नेमके काय घडणार, याबाबत सूतोवाच केले.
९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार
पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, कोणतेही मिशन सांगून राबवले जात नाही. मुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा पाहता, त्यांना कुठलेही मिशन राबवण्याची गरज नाही. बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेनाएकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चालते, हे अनेक जणांना कळून चुकले आहे, त्यामुळे अनेक जण संपर्कात आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे निश्चित आहे. मी पुढील ९० दिवसांत मोठे पक्षप्रवेश होणार असे सांगितलं होते. एक दिवस किंवा २४ तासात होणार, असे म्हटले नव्हते. रत्नागिरीत जो कार्यक्रम करुन दाखवला, ती झलक होती. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील १० ते १२ माजी आमदार शिवसेनेत येणार, यावर मी ठाम आहे. एकनाथ शिंदेंचे नेतृत्व ठाकरेंपेक्षा भावनाशील आहे, असे अनेकांचे मत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारण करतो. एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आम्ही गुवाहाटीला गेलो, पुन्हा मंत्री झालो. त्यांच्या राजकीय प्रवासात त्रास होईल असे कुठले कृत्य आमच्याकडून होणार नाही. इतरांनी आमच्यात भांडणे लावण्याचे बालिश राजकारण करु नये, या शब्दांत उदय सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.