“उद्धव ठाकरे अकार्यक्षम CM होते, खेकड्यांना जपलं असतं तर...”; शिंदे गटाचा मुलाखतीवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 17:12 IST2023-07-25T17:11:38+5:302023-07-25T17:12:48+5:30
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावे लागेल. तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय? असा सवाल शिवसेना शिंदे गटाने केला आहे.

“उद्धव ठाकरे अकार्यक्षम CM होते, खेकड्यांना जपलं असतं तर...”; शिंदे गटाचा मुलाखतीवर पलटवार
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून सातत्याने शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. ठाकरे गटाकडूनही शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांच्या एका मुलाखतीवरून शिंदे गटातील नेत्यांनी निशाणा साधला आहे.
‘आवाज कुणाचा’ या शिवसेना ठाकरे गटाच्या मुलाखत सत्रात उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचा टीझर प्रकाशित झाला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिली आहेत. भाजप म्हणते की तुम्ही पाठीत खंजीर खुपसला, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला तेव्हा मी जर खंजीर खुपसला, असे म्हणता मग राष्ट्रवादीने काय खुपसले होते? तुम्ही राष्ट्रवादी पक्ष का फोडला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. यावर आता शिंदे गटातील आमदारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
खेकड्यांना जपले असते तर...
मुलाखतीदरम्यान तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेले, असा सवाल संजय राऊतांनी विचारला त्यावर सरकार वाहून गेले नाही. तर खेकड्यांनी ते पोखरले, असे उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. या टीकेला आता गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला खेकडा म्हणता तर म्हणा. पण लक्षात ठेवा खेकडाच कावीळवर योग्य पर्याय ठरतो. या खेकड्यांना जपले असते तर शिवसेना फुटली नसती, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाताय ही चांगली बाब आहे. आम्हाला एक कळत नाही आमचा दोष काय होता? आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावे लागेल. तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय?, असे प्रतिप्रश्न गुलाबराव पाटील यांनी केलेत.
उद्धव ठाकरे यांनी आम्हाला न्याय दिला नाही, म्हणून उठाव झाला
आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला न्याय दिला नाही, म्हणून उठाव झाला, असे संजय शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरे अकार्यक्षम मुख्यमंत्री होते, या शब्दांत संजय गायकवाड यांनी टीकास्त्र सोडले.