Shiv Sena Shinde Group And Thackeray Brothers: विधानसभा, नगर पालिका अन् आता महापालिकांमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ब्रँड दिग्विजयी असल्याचे सिद्ध केले. भाजपाने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली असून २९ पैकी २४ महापालिकांवर भाजपा-शिंदेसेना युतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच महापालिकांमध्येही भाजपा सर्वाधिक जागा मिळवत नंबर एकचा पक्ष ठरला असून, उद्धवसेना, शरद पवार गटाचे अस्तित्वच राहिले नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येऊनही मुंबईतील सत्ता राखू शकलेले नाहीत. हा दोन्ही ठाकरेंसाठी धक्का मानला जात आहे. यातच महापौरपदासाठी आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाच्या एका नेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेनेने धक्कातंत्राचा वापर करत मनसेला सोबत घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक आणि उद्धवसेनेचे चारजण संपर्कात आहेत. अशाप्रकारे अभूतपूर्व 'जोड-तोड' राजकारणातून शिंदेसेना महापौरपदासाठीची मॅजिक फिगर गाठण्याच्या तयारीत आहे. यातच शिंदेसेनेचे नेते संतोष रघुनाथ नलावडे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये उद्धवसेनेसोबत जाऊन मनसेचा काही फायदा झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
उद्धवसेनेसोबत युतीमुळे मनसेचे नुकसान झाले
उद्धवसेनेसोबत युतीमुळे मनसेचे नुकसान झाले.. मनसेची फसवणूक झाली, केसाने गळा कापला... कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेची अखेर खऱ्या शिवसेनेला साथ... २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे स्वबळावर लढून ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यापेक्षा यावेळी स्थिती अधिक चांगली होती. परंतु उद्धवसेनेसोबत युती केल्याने अपेक्षित यश मिळाले नाही. उद्धवसेनेने मुळात कमी जागा मनसेला दिल्या. त्यातही निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा स्वतःकडे ठेऊन पडीक जागा मनसेच्या माथी मारल्या. निवडणुकीत मनसेला मदत केली नाही. मनसेच्या प्रभागातील उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांना अन्य प्रभागात जाऊन काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसेचे उमेदवार एकाकी लढत होते, असा दावा नलावडे यांनी केला आहे.
मनसेला संपवता येणार नाही हे लक्षात आल्यावर युती करून केसाने गळा कापला
मनसेची मते उद्धवसेनेला ट्रान्सफर झाली. पण उद्धवसेनेची मते मनसेला ट्रान्सफर झाली नाही. मागच्यावेळी मनसेचे निवडून आलेले नगरसेवक उद्धवसेनेने पळवले होते. मनसेला संपवण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. परंतु मनसेला असे संपवता येणार नाही हे लक्षात आल्यावर युती करून केसाने गळा कापला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अन्य कशाही पेक्षा महाराष्ट्र महत्त्वाचा आहे हे निवडणुकीपूर्वी सांगितले होते. आता त्याच विचाराने महाराष्ट्र व मुंबईच्या विकासासाठी भाजप आणि स्व. बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या खऱ्या शिवसेनेसोबत जावे लागेल. २०१९ साली जनतेने वेगळा जनादेश दिलेला असताना तो नाकारून स्वार्थासाठी उद्धव ठाकरे हिंदुत्वविरोधी विचारधारेसोबत गेले होते. मनसेने हिंदुत्व व बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या लोकांसोबत पुढे जायला कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते कोणाचेच होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहणे चुकीचे नाही, तर धोक्याचे आहे. हीच वेळ आहे मनसेला सावरण्याची, असे नलावडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, कोकण विभागीय आयुक्तांकडे बसने एकत्र जाऊन शिंदेसेनेने ५३, तर मनसेने ५ नगरसेवकांचा गट स्थापन केला. स्थानिक पातळीवरील नेते स्थानिक निर्णय घेऊ शकतात, असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला.भाजपाचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी सांगितले की, मनसेने महायुतीला पाठिंबा दिला असून, युतीचा महापौर होणार हे ठरले आहे, त्यामुळे कुणालाही काळजीचे कारण नाही, असे म्हटले जात आहे.