“संजय राऊत आमच्या गटात येत असतील तर आम्ही नक्की विचार करू”; शहाजीबापू पाटलांची खुली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 14:40 IST2023-07-09T14:39:51+5:302023-07-09T14:40:51+5:30
Shahaji Bapu Patil Offer to Sanjay Raut: संजय राऊतांच्या भोवतीने महाराष्ट्राचे राजकारण फिरत नाही, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

“संजय राऊत आमच्या गटात येत असतील तर आम्ही नक्की विचार करू”; शहाजीबापू पाटलांची खुली ऑफर
Shahaji Bapu Patil Offer to Sanjay Raut: राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तर दुसरीकडे शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, यातच आता थेट संजय राऊत यांना शिवसेना शिंदे गटात येण्याची ऑफर देण्यात आली आहे.
आम्हा ४० आमदारांची भूमिका ही संजय राऊत या एकट्यासाठी निर्माण झालेली नव्हती. संजय राऊतांच्या भोवतीने महाराष्ट्राचे राजकारण फिरत नाही. त्यामुळे आमची भूमिका ही शिवसेना वाढवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी होती, असे सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नोटीस बजावली आहे, अशी माहिती आहे. त्यावर मला अद्याप नोटीस आलेली नाही. मात्र आल्यानंतर आम्ही सात दिवसात कायदेशीर बाजू मांडेन, अशी माहिती शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे.
संजय राऊत आमच्या गटात येत असतील तर आम्ही नक्की विचार करू
एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य मानून संजय राऊत जर आमच्या गटात येत असतील तर त्याचा आम्ही जरूर विचार करू, असे सांगत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांना खुली ऑफर दिली आहे. शहाजीबापू पाटालांनी संजय राऊतांना थेट पक्षांतराची ऑफर दिल्याने सांगोल्यासह महाराष्ट्रात त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अजितदादांच्या येण्याने सत्तेत थोडाफार परिणाम असणार पण काळाच्या ओघात तो स्वीकारावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांच्या सभांचे परिणाम काय होईल हे आज सांगणे कठीण आहे. मात्र अजितदादासोबत आलेले आमदार आपल्या मतदारसंघात ताकदवान आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या सभांचा फार परिणाम होणार नाही. एक भावनिक युद्ध होईल आणि राजकारण आपल्या मूळ वाटेवरून चालत राहील, असे सांगताना, आमचे नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत. प्रभावी नेतृत्व आणि निर्णयक्षमता त्यांच्याकडे आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.