गुजरात व्यापारी, पण महाराष्ट्र लढणारा; दिल्लीच्या आडमुठेपणामुळे लसीकरण थांबले : शिवसेना 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 08:23 AM2021-05-01T08:23:21+5:302021-05-01T08:25:29+5:30

महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री व सरकार असल्याने दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करतायत : शिवसेना

shiv sena saamna editorial slams central government coronavirus covid vaccine medicine maharashtra day | गुजरात व्यापारी, पण महाराष्ट्र लढणारा; दिल्लीच्या आडमुठेपणामुळे लसीकरण थांबले : शिवसेना 

गुजरात व्यापारी, पण महाराष्ट्र लढणारा; दिल्लीच्या आडमुठेपणामुळे लसीकरण थांबले : शिवसेना 

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री, सरकार असल्याने दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करतायत : शिवसेनामहाराष्ट्र व गुजरात ही तशी जुळी भावंडे, पण या नात्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होतोय, शिवसेनेचा आरोप

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशा परिस्थिीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवर, लसी यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेनं केंद्रावर पुन्हा एकदा टीका केली आहे. 'गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे. संकटाशी लढण्याची मोठी परंपरा हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे.  महाराष्ट्राचे कोरोनाचे लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबले आहे. महाराष्ट्राला इंजेक्शन, औषधांचा पुरवठा नीट होत नाही,' असं म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्राला इंजेक्शन, औषधांचा पुरवठा नीट होत नाही. ज्या महाराष्ट्राने आर्थिक प्राणवायूचा पुरवठा देशाला केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय व आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच आहे. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही, असं म्हणत शिवसेनेने केंद्रावर टीका केली आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्रावर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री व सरकार असल्याने दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱहेने कोंडी करीत आहेत. महाराष्ट्राचे कोरोनाचे लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबले आहे. महाराष्ट्राला इंजेक्शन, औषधांचा पुरवठा नीट होत नाही. ज्या महाराष्ट्राने आर्थिक प्राणवायूचा पुरवठा देशाला केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय व आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच आहे. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राच्या हक्काचे व न्याय्य वाटय़ाचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले. 

महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प व योजना गुजरातला नेऊन ठेवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करायचे व महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू. त्याच गुजरात राज्यात शेवटी कोरोना रुग्ण रस्त्यांवर तडफडून प्राण सोडताना दिसत आहेत. हे दृश्य विदारक आहे. महाराष्ट्र व गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले. त्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आजही होतच आहे. गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे. 

संकटाशी लढण्याची मोठी परंपरा हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात पंडित नेहरू प्रतापगडावर आले तेव्हा त्यांच्यासमोर निधडय़ा छातीने महाराष्ट्र उभा राहिला होता. महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे, बूड आहे म्हणून तो टिकला आहे. महाराष्ट्रनिर्मितीचा क्षण हा मंगलमयच असतो. तो दिवस महाराष्ट्राचे शौर्य व धैर्य दाखविणारा असतो. आज महाराष्ट्रावरचे संकट मोठे आहे. कोरोना विषाणूने मोठे आव्हान उभे केले आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी पडझड होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील आणि विजयी होईल.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shiv sena saamna editorial slams central government coronavirus covid vaccine medicine maharashtra day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app