शिवसेना, राष्ट्रवादी या लहान भावांना सांभाळा! कामाला लागा, फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 17:35 IST2023-10-03T17:34:41+5:302023-10-03T17:35:34+5:30
प्रदेश पदाधिकारी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबोधित केले. २०२४ च्या लोकसभेच्या तयारीसाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा.

शिवसेना, राष्ट्रवादी या लहान भावांना सांभाळा! कामाला लागा, फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सर्वोच्च शिखरावर नेण्याचे काम केले आहे. ९ वर्षांत भारत बदलला आहे. विरोधकांचे काम हे मोदींना विरोध करणे आहे. त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाहीय. त्यांचे दुकान बंद होईल म्हणून ते एकत्र आले आहेत. यामुळे मोदीना पंतप्रधान बनवणे हे भाजपासाठीच नाहीतर भारतासाठी महत्वाचे आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
प्रदेश पदाधिकारी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबोधित केले. २०२४ च्या लोकसभेच्या तयारीसाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा. आपली जबाबदारी समजून कामे केली पाहिजेत. तीन पक्षाचे सरकार आहे. भाजप मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळायचे असते, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
नरेंद्र मोदींनी कुठेही भाषण केले तर जनता त्यांना ऐकायला येते, पण अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी आंध्र प्रदेशात भाषण केले तर त्यांना ऐकायला कोण येणार? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच भारताने आपल्या प्रगतीचा वेग मंदावू दिला नाही, किंबहूना तो वाढवला. भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे फडणवीस म्हणाले.
लोक ज्यावेळी मोदींचा विचार करतात त्यावेळी राहुल गांधी यांच्या बाबत लोकांच्या मनात ते लढा देऊ शकत नाही हेच विचार असतात. इंडिया आघाडीत आपआपसात वाद, ही स्थिती अशी आहे की ते एकत्र राहू शकणार नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली.