फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 10:47 IST2024-12-16T10:45:10+5:302024-12-16T10:47:23+5:30

एवढे झाल्यानंतर आज जे मागून आलेत, पक्षप्रवेश केलेत त्यांना मंत्रि‍पदे दिली. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही. इकडे तिकडे जातात त्यांना मंत्रिपद दिले मग मी पदावर राहून करू काय? असा सवाल नाराज आमदाराने उपस्थित केला.

Shiv Sena MLA Narendra Bhondekar is angry with Eknath Shinde for refusing him a ministerial berth, Devendra Fadnavis had insisted on him joining BJP | फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी

फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी

भंडारा - मंत्रि‍पदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्यानं नाराज होत भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात मागून आलेल्यांना न्याय मिळतो, परंतु आम्हाला नाही. भाजपा प्रवेशाचा आग्रह असताना आम्ही शिवसेनेत आलो त्याचा आता पश्चाताप झाल्यासारखं वाटतं असं विधान भोंडेकर यांनी केले आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेता पदाचा राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, मागच्या अडीच वर्षापूर्वी १० अपक्ष आमदारांमध्ये सगळ्यात आधी मी एकनाथ शिंदेंसोबत गेलो. कुठलाही स्वार्थ न ठेवता मी गेलो तेव्हा मला शब्द दिला होता. नक्कीच सरकार आपलं होणार आहे, तुम्हाला सन्मानाने मंत्रिपद देऊ परंतु मंत्रिपद दिले नाही. मात्र मंत्रिपद न मिळताही सोबत राहिलो, आमचा उद्देश सेना-भाजपा सरकार राहिले पाहिजे असा होता. अडीच वर्षानंतर जेव्हा पक्षप्रवेशाची वेळ आली. तेव्हा चर्चा झाली, मागे मंत्रिपद नाही, महामंडळही दिले नाही परंतु आता नव्या सरकारमध्ये तुम्हाला मंत्री बनवू असं सांगितले. आमच्यात बोलणे झाले तेव्हाही शब्द दिला आणि जाहीरसभेतही बोलून दाखवले असं त्यांनी सांगितले.

तसेच एवढे झाल्यानंतर आज जे मागून आलेत, पक्षप्रवेश केलेत त्यांना मंत्रि‍पदे दिली. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही. इकडे तिकडे जातात त्यांना मंत्रिपद दिले मग मी पदावर राहून करू काय? शिवसेनेत नेता, उपनेता हे मोठे पद असते. ६ जिल्ह्याचे समन्वयक पद आहे. परंतु कुठलीही चर्चा नाही. कुठलीही विचारपूस नाही. कुठलीही संधी नाही. मी जर न्याय देऊ शकत नाही त्यासाठी पदाचा राजीनामा दिला. भविष्यात अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मनात आहेत त्या मी आज सांगू शकत नाही. मी शिवसैनिक म्हणून आहे आणि राहीन परंतु जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी फक्त माझ्या जिल्ह्यातील लोकांसाठी थांबलो आहे नाहीतर आमदारकीचाही राजीनामा दिला असता. आमचा जिल्हा कधीपर्यंत बाहेरच्या उधार पालकमंत्र्यावर राहील, जिल्ह्याचा पालकमंत्री असता तर नक्कीच विकास झाला असता. त्यासाठीच आम्ही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला परंतु आज शोकांतिका आहे आमच्या जिल्ह्याचा पुन्हा पालकमंत्री मिळणार नाही अशी खंत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, मला भाजपातील पक्षप्रवेशासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता. मलाही ते नेते म्हणून आवडतात. परंतु माझ्यावर पक्षांतराचा काही लागू नये म्हणून मी जुन्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पश्चातापाची वेळ आल्यासारखे वाटतं. इथं शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या ताकदीवर आहोत. एवढे मोठे पद असताना अशी परिस्थिती येते तेव्हा नक्कीच मनात तसं वाटतं. या सगळ्या गोष्टींवर भविष्यात मी परिस्थिती आल्यावर बोलेल असा इशाराही आमदार भोंडेकरांनी दिला.

प्रामाणिकतेला किंमत नाही...

एकनाथ शिंदे यांना पाहून आम्ही पक्षात प्रवेश केला होता. शिंदेंनी विश्वासात घ्यायला पाहिजे होते. एवढे मोठे पक्षाचे उपनेते पद दिले पण त्याचा काही अर्थ आहे का? कुठेही विचारात न घेता मागून आलेल्या तुम्ही मंत्रिपद देता हे दु:ख वाटण्यासारखेच आहे. प्रामाणिकतेला काही अर्थ राहत नाही हे दिसून येते. प्रामाणिक कितीही राहा त्याला किंमत नसते, जे मागून येतात, थोडी हुल्लडबाजी करतात त्यांना न्याय मिळतो असं पाहायला मिळते अशी उघड नाराजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली.  

Web Title: Shiv Sena MLA Narendra Bhondekar is angry with Eknath Shinde for refusing him a ministerial berth, Devendra Fadnavis had insisted on him joining BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.