"आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच निश्चित झालाय, तो आमच्याविरोधात लागणार’’, वैभव नाईक यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 15:28 IST2024-01-10T15:28:30+5:302024-01-10T15:28:46+5:30
Shiv sena MLA Disqualification Results: आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाला असून, तो आमच्या विरोधात जाणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार अपात्र ठरणार आहेत, असा सनसनाटी दावा ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

"आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच निश्चित झालाय, तो आमच्याविरोधात लागणार’’, वैभव नाईक यांचा आरोप
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी आता केवळ काही मिनिटांचा अवधी राहिला आहे. या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निकाल देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाला असून, तो आमच्या विरोधात जाणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार अपात्र ठरणार आहेत, असा सनसनाटी दावा ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
वैभव नाईक या निकालाबाबत अंदाज व्यक्त करताना म्हणाले की, खरंतर मी निकालाबाबत उत्सुक होतो. ही लढाई सत्य आणि सत्तेमधील असेल, असं वाटत होतो. मात्र आता मंत्रालयात फिरत असताना मला अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे आमदार भेटले. त्यांनी हा निकाल ठाकरे गटाविरोधात लागणार असून, ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरणार असल्याचे सांगितले. याआधी शिवसेनेचं नाव आणि चिन्ह जाईल असा दावा करण्यात येत होता. तसं पुढे घडलं होतं. आता उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार अपात्र ठरतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा निकाल ठरवून घेतलेला आहे. आता आम्ही या निर्णयाविरोधात कोर्टात तर जाणारच आहोत. सोबतच आम्ही जनतेसमोरही जाणार आहोत, असे संकेतही वैभव नाईक यांनी दिले.
यात सत्तेचा गैरवापर कसा झालाय हे दिसून येतंय. विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार हे आधीच काही लोकांना कळलंय. या निकालाबाबत जी स्क्रिप्ट होती त्याप्रमाणेच सगळं घडतंय, असं याठिकाणी दिसून येतंय. आमदार अपात्रता प्रकरणामध्ये काय निकाल द्यायचा हे आधीच ठरलेलं आहे. हा निकाल लोकशाहीसाठी धक्कादायक निकाल असेल, अशा आरोपही वैभव नाईक यांनी केला.