उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांच्या विधानावर शिंदेसेनेचा सल्ला; "आज ते तुमच्याशी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:51 IST2025-01-11T19:50:25+5:302025-01-11T19:51:04+5:30

जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा असं पाटलांनी सांगितले. 

Shiv Sena Minister Gulabrao Patil criticizes Uddhav Thackeray and gives advice to Devendra Fadnavis | उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांच्या विधानावर शिंदेसेनेचा सल्ला; "आज ते तुमच्याशी..."

उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांच्या विधानावर शिंदेसेनेचा सल्ला; "आज ते तुमच्याशी..."

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच एका मुलाखतीत उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं विधान केले त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या विधानावरच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी फडणवीसांना सावध सल्ला दिला आहे. आज ते तुमच्याशी गोड बोलतील पण ते कोणाचेच नाहीत असं सांगत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जळगावात पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना एकतर तू राहतो नाहीतर मी राहतो असे म्हणाले, आज ते त्यांची पप्पी घेतायेत. आपलं स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी वाट्टेत तिथे जाण्याचा प्रयत्न करतायेत. आपल्याला जर एवढेच होते तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचारधारा सोडू नका सांगितले त्याच वेळी आमचे ऐकले असते तर आज हे दिवस आले नसते. कदाचित हे त्यांच्या लक्षात आले असेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच  मागील काळात जी युती झाली ती न टिकणारी होती. उद्धव ठाकरे कोणत्या विचारधारेचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले. शरद पवार आणि अजित पवार हे एकाच विचाराचे परंतु काही कारणास्तव ते वेगवेगळे झाले. काँग्रेसचा ठिकाणाच राहिला नाही. निकालामुळे एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांमुळे सुरू आहे. काही दिवसांनी हे पक्ष राहतील की नाही अशी परिस्थिती आली आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसशी फारकत घेतायेत, राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेतायेत. राष्ट्रवादीचा एक गट नाराज असून नेतृत्व बदलण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे चित्र काही ठिकाण्यावर नाही. पुढच्या काळात यांचे डबडे वाजणार आहे असा टोला गुलाबराव पाटलांनी महाविकास आघाडीला दिला.

दरम्यान, विचारधारा सोडून जे लोक लांब जात होते, भगव्या झेंड्याकरता आम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत आलो आहे. जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा. मी फडणवीसांना सल्ला देण्याइतका मोठा माणूस नाही पण शेवटी ज्या वेळी आपला पक्ष अडचणीत होता. मोदींचे सरकार यावे यासाठी प्रयत्न करत होता त्यावेळी हे लोक कोणासोबत होते, आता यांच्याकडे काहीच राहिले नाही. त्यामुळे हे तुमच्याकडे येतायेत. तुमच्याशी गोड बोलतायेत पण हे लोक कुणाचेच नाही याचा निश्चितपणाने  विचार करावा अशी माझी विनंती आहे असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.  
 

Web Title: Shiv Sena Minister Gulabrao Patil criticizes Uddhav Thackeray and gives advice to Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.