नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशात शिवसेनेकडून अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 18:07 IST2017-10-29T18:03:43+5:302017-10-29T18:07:44+5:30

काँग्रेसमधून बाहेर पडून एनडीएच्या गोटात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशामध्ये शिवसेनेने अडथळा आणल्याचे वृत्त आहे. नारायण राणेंना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गांभीर्याने विचार करावा लागेल, अशा आशयाचा निरोप...

Shiv Sena interfere in Narayan Rane's cabinet entry | नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशात शिवसेनेकडून अडथळा

नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशात शिवसेनेकडून अडथळा

मुंबई - काँग्रेसमधून बाहेर पडून एनडीएच्या गोटात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशामध्ये शिवसेनेने अडथळा आणल्याचे वृत्त आहे. नारायण राणेंना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गांभीर्याने विचार करावा लागेल, अशा आशयाचा निरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांना पोहोचवला आहे. 
या संदर्भातील वृत्त एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत नारायण राणेंनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र राणेंचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश अद्याप अडलेला आहे. राणेंच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह बैठका झाल्या आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिपदाविषयी अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. राणेंच्या एनडीए प्रवेशामुळे नाराज असलेल्या शिवसेनेने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकरवी आपला निरोप मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला आहे.  याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला अनुकूलता दर्शवली होती.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हातील नारायण राणेंचे विरोधक आणि गृह,अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी केली होती.  आठ दिवसांत मोठ्या घडामोडी घडतील, अशी पुस्तीही त्यांनी याला जोडली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, नारायण राणे, प्रकाश परब आदी उपस्थित होते. 
मंत्री केसरकर म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी येणार आहे. अनेक कामे प्रस्तावित केली आहेत. बांधकाम विभागाच्या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. तेथे खड्डे भरण्यासाठी कोणताही ठेकेदार पुढे येत नाही. त्यामुळे आता बांधकाम विभाग स्वत:च हे खड्डे भरेल, असे मंत्री केसरकर यांनी जाहीर केले. याबाबतचे आदेश सावंतवाडी बांधकाम विभागाला दिले आहेत. तर कणकवली बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठविला तर त्यांनाही असे आदेश दिले जातील," असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena interfere in Narayan Rane's cabinet entry