Shiv Sena currently has 'night games'! Kesarkar and Ramdas Kadam charged | शिवसेनेत सध्या ‘रात्रीस खेळ चाले’! केसरकर आणि रामदास कदमांवर जादूटोणा केल्याचा आरोप

शिवसेनेत सध्या ‘रात्रीस खेळ चाले’! केसरकर आणि रामदास कदमांवर जादूटोणा केल्याचा आरोप

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माझ्यावर जादूटोणा करून माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांची काळीजादू चालणार नसून मी गप्प बसणार नाही, असा गंभीर आरोप सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत
केला. साळगावकर हेही शिवसेनेत असून हा आरोप करत त्यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

साळगावकर म्हणाले, ३५ दिवसांपूर्वी मला भेटण्यासाठी केसरकर हे शिवाजी चौकातील इमारतीमध्ये आले होते. त्या भेटीनंतर मी सतत आजारी पडत आहे. माझे तोंड बंद करण्यासाठी काहीतरी जादूटोणा केला असण्याची शक्यता आहे. केसरकर राजकारणासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. वैचारिक मतभेद असावेत, पण एखाद्याला संपविण्याचा कट असू नये. असा जादूटाणा करून आम्ही गप्प बसणार नाही. आता माझा तोफखाना सुरूच झाला आहे. तो निवडणुकीतही सुरूच राहणार आहे. माझ्याकडे डायरी आहे. त्यात सर्व काही आहे. लवकरच बाहेर काढणार आहे. राणेंचा भाजप प्रवेश रखडायलाही केसरकरांची जादूच कारणीभूत असल्याचा दावाही साळगावकर यांनी केला.

पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणजे भगतगिरी आणि जादूटोणावाले असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचेच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी दापोली येथे एका पत्रकार परिषदेत केला आहे. गेली काही वर्षे दळवी आणि कदम यांच्यातील वाद सातत्याने उघडपणे समोर येत असताना आता दळवी यांच्या आरोपामुळे त्यात भर पडली आहे.

मंत्री कदम हे बंगालीबाबांना सोबत घेऊन फिरतात आणि विशेष म्हणजे कदम यांना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठीही आमच्यासोबत भगत दिला होता, असा आरोप दळवी यांनी केला आहे. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे आणि खेड तालुक्यातील जामगे येथील घराच्या गच्चीवर बंगाली बाबांनी दिलेले कोहळे कापायचे, असेही दळवी यांचे म्हणणे आहे. कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये, ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला, त्या मतदार संघातून निवडणूक लढवावी. माझ्या मतदार संघात मी आमदार नसलो तरी चालेल, पण या मतदार संघातला आणि पक्षासाठी त्याच योगदान आहे, असा कोणीही उमेदवार चालेल, असेही दळवी यांनी सांगितले.

कदम यांनी आतापर्यंत चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केले आहे. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असाही दावा दळवी यांनी केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक वाद उभा राहणार आहे. दापोली विधानसभा मतदार संघातून आता रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena currently has 'night games'! Kesarkar and Ramdas Kadam charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.