शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका; सामनातून केंद्रसरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:15 IST2019-11-20T11:05:58+5:302019-11-20T12:15:47+5:30
आधी कोरडा दुष्काळ आणि नंतर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जगणे असह्य करून सोडले आहे.

शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका; सामनातून केंद्रसरकारवर निशाणा
मुंबई : आधीचे कर्ज डोक्यावर असतानाच परतीच्या पावसाने पिकांची जी प्रचंड नासाडी केली त्यामुळे खचलेला शेतकरी रोज मृत्यूला कवटाळतो आहे. मागील एका महिन्यात मराठवाडय़ातील 68 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडेदेखील अस्वस्थ करणारे आहेत. हतबल शेतकरीकेंद्र सरकारकडे मोठय़ा आशेने पाहत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, तातडीने भक्कम आधार देऊन त्यांचे प्राण वाचवा, असे म्हणत शिवसेनेकडून सामानातून केंद्रसरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
आधी कोरडा दुष्काळ आणि नंतर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जगणे असह्य करून सोडले आहे. खासकरून मराठवाडय़ातून येणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. मराठवाडय़ाच्या प्रत्येक जिल्हय़ात आत्महत्यांचे सत्रच सुरू झाले आहे. 14 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत मराठवाडय़ातील 68 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर हतबल झालेले शेतकरी केंद्र सरकारकडे मोठय़ा आशेने पाहत आहेत.
दुबार पेरणीच्या संकटाला तोंड देतानाच पीक विम्यासाठी रांगा लावाव्या लागतात़. नुकसान झाले तर पुन्हा पीक विम्याच्या भरपाईसाठी कंपन्यांच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात. तर राष्ट्रपती राजवटीतील सरकारने अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाही. शिवाय राज्यपालांनी जी मदत जाहीर केली तीही इतकी तुटपुंजी आहे की त्यातून शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नसल्याचे सामनात म्हटलं आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी मदत केंद्र शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर जाऊन शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यातच राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटू न शकल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हवी असलेली मदत मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकरकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.