मुंबई : शिवसेनाकाँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहे. गेल्या पंधरवड्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्हिडीओ, वक्तव्यांचे फोटो व्हायरल करून ते कसे काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करत होते हे दाखविले जात होते. मात्र, इतिहासात डोकावल्यास शिवसेना काँग्रेसची मैत्री ही काही आजची नसल्याचे स्पष्ट होत आहे. या मैत्रीला तब्बल चार दशकांचा म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या सुवर्णकाळाचा इतिहास आहे.
शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली होती. मात्र, या 53 वर्षांच्या काळात पाच असे मोठे प्रसंग आले की दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केली होती. तर शिवसेनेने डाव्या विचारांच्या पक्षांना, उमेदवारांना तब्बल 22 वेळा मदत केली होती.
वैभव पुरंदरे यांच्या बाळ ठाकरे आणि शिवसेनेचा उदय या पुस्तकात शिवसेनेच्या पहिल्या प्रचारसभेला तेव्हाचे काँग्रेसचे मोठे नेते रामाराव आदिक सहभागी झाले होते. रामाराव आणि बाळासाहेब ठाकरे मित्र होते. ठाकरे यांनी तेव्हा सांगितले होते की कम्युनिस्टांना हरविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तर एप्रिल 2004 मध्ये सुहास पळशीकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातही याची उल्लेख आहे. राजकीय विश्लेषक उदय तानपाठक सांगतात की, 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे समर्थन होते. यामुळे नंतर शिवसेनेला वसंत सेना असेही म्हटले जाऊ लागले. 1971 मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक कामराज यांच्या काँग्रेससोबत मिळून लढविली होती. नंतर इंदिरा काँग्रेसचा गट पुढे आला.