शिवसेनेने जागा बदलली! आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवणार; भाजपाही लागली तयारीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 13:20 IST2022-06-16T13:19:42+5:302022-06-16T13:20:18+5:30
भाजपानेही अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवताना अपक्षांशी संपर्कात राहण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत.

शिवसेनेने जागा बदलली! आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवणार; भाजपाही लागली तयारीला
राज्यसभेला दगाफटका झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने आपल्या आमदारांना ट्रायडंट सोडून दुसऱ्याच हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १८ जूनपासूनच आपल्या आमदारांना हॉटेलवर राहण्य़ास येण्याचे आदेश दिले आहेत.
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपा आपल्या ताकदीवर उमेदवार निवडून आणू शकत नाहीय. यामुळे अपक्ष आणि अन्य पक्षांच्या जिवावरच सारी भिस्त आहे. यातच दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना दोन दिवसांत रेनेसॉमध्ये बोलविले आहे. याचबरोबर भाजपानेही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
२० जूनला विधान परिषदेची निवडणूक होत आहे. राज्यसभा निवडणुकीला अर्ज माघारीच्या दिवशी मविआचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा विधानपरिषदेवरून डील करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतू भाजपानेच उलटे फासे टाकल्याने विधानपरिषदेची निवडणूकही तशीच होणार असल्याचे संकेत मिळाले होते.
१८ जून रोजी शिवसेनेच्या आमदारांची महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. राज्यसभेला गणित चुकले होते, यामुळे पुन्हा दगाफटका होऊ नये म्हणून दोन दिवस आधीपासूनच आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. राज्यसभेला सांगूनही आदित्य ठाकरेंचे मत बाद होता होता राहिले होते. एका आमदाराचेही मत बाद झाले होते. यामुळे शिवसेना आपल्या आमदारांना मतदानाची प्रक्रिया आणि रणनीती देखील ठरविणार आहे.
भाजपानेही अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवताना अपक्षांशी संपर्कात राहण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत.