Shiv Sena: उद्धव ठाकरेंना अजून मोठा धक्का? मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील ७ खासदारांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 14:20 IST2022-07-11T14:09:52+5:302022-07-11T14:20:39+5:30
Shiv Sena:राष्ट्पतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका काही खासदारांनी मांडली असतानाच आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे लोकसभेतील खासदार अनुपस्थित असल्याचे वृत्त आहे.

Shiv Sena: उद्धव ठाकरेंना अजून मोठा धक्का? मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील ७ खासदारांची दांडी
मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेमध्ये झालेली फुटाफूट अद्याप सुरू आहे. या बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव यांच्यावर मुख्यमंत्रिपद सोडण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर पक्ष टिकवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. मात्र आता आमदारांनंतर शिवसेनेचे लोकसभेतील खासदारही पक्षनेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे. राष्ट्पतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका काही खासदारांनी मांडली असतानाच आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे लोकसभेतील खासदार अनुपस्थित असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संसदेतील शिवसेनेच्या २२ खासदारांपैकी केवळ १५ खासदार आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थितीत आहेत. त्यामध्ये राज्यसभेतील संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या खासदारांचा समावेश आहे. तर लोकसभेतील १९ पैकी अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, प्रतापराव देशमुख, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर आदी १२ खासदार उपस्थित आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, कृपाल तुमाने आणि कलाबेन डेलकर हे खासदार या बैठकीला अनुपस्थित आहेत. तर राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई हे दिल्लीत असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे खासदाराचं वैयक्तिक मत जाणून घेत आहेत. खासदारांच्या दबावानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.