गुवाहाटीला पोहोचलेल्या केसरकरांविरोधात शिवसैनिकांचा संताप, सावंतवाडीत मोठा मोर्चा काढून केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:08 IST2022-06-27T14:07:45+5:302022-06-27T14:08:18+5:30
Deepak Kesarkar: बंडाचा झेंडा खांद्यावर घेत गुवाहाटीला पोहोचलेल्या दीपक केसरकरांचे निवासस्थान असलेल्या सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांकडून त्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. आज सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि केसरकरांच्या विरोधात मोठा मोर्चा काढला.

गुवाहाटीला पोहोचलेल्या केसरकरांविरोधात शिवसैनिकांचा संताप, सावंतवाडीत मोठा मोर्चा काढून केला निषेध
सावंतवाडी - पक्षातील आमदारांनी केलेल्या बंडाळीमुळे सध्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, शिवसेनेचे सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनीही बंडाचा झेंडा खांद्यावर घेत गुवाहाटीची वाट धरली होती. तिथे ते बंडखोर आमदारांचे प्रवक्ते बनले आहेत. दरम्यान, दीपक केसरकरांचे निवासस्थान असलेल्या सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांकडून त्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. आज सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि केसरकरांच्या विरोधात मोठा मोर्चा काढला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीत काढलेल्या शिवसेनेच्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. या मोर्चाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आमदार वैभव नाईक,संदेश पारकर, अरूण दुधवडकर,सतीश सावंत,अतुल रावराणे,रूपेश राऊळ,बाबूराव धुरी,मायकल डिसोझा आदिचा समावेश होता, दरम्यान, या मोर्चावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सावंतवाडी शहरातील शिवाजी चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थाना समोरून जात असताना शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ते तब्बल पाच मिनिटे केसरकर यांच्या निवास्थानासमोर थांबले. यावेळी पोलिसांनी चारही बाजूंनी मोर्चा ला घेरले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे स्वत : केसरकर यांच्या निवासस्थानासमोर ठाण मांडून होते.
मात्र शिवसैनिकांनी घोषणा दिल्या या व्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही विशेष करून शिवसेना पदाधिकारी दक्ष होते. शिवसैनिकांना आवरताना दिसत होते.