शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
By यदू जोशी | Updated: July 12, 2025 05:59 IST2025-07-12T05:58:41+5:302025-07-12T05:59:38+5:30
आमदाराने केलेली मारहाण, प्राप्तिकराचा घोळ, मंत्र्याचा व्हिडीओ यामुळे कोंडी करण्यासाठी आयते मुद्दे हाती

शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
यदु जोशी
मुंबई : सत्तारुढ महायुतीतील घटक पक्ष असलेली शिंदेसेना गेले काही दिवस वादांच्या रडारवर असून या पक्षाचे मंत्री, आमदारांबाबत घडलेल्या घटनांनी शिंदेसेना आणि सरकारला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाल्याचे चित्र आहे.
राज्यात महायुतीचे भक्कम बहुमताचे सरकार असताना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या प्रकरणांमुळे सरकारची कोंडी करण्यासाठीचे आयते मुद्दे विरोधकांना मिळाल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना दोन दिवसांपूर्वी अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले.
त्यातच खा. श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्याचे विधान त्यांच्याच पक्षाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केल्याने या दोन गोष्टींना जोडून विरोधकांनी आणि विशेषत: उद्धव सेनेच्या नेत्यांनी टीकेची झोड उठविली. महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना या दोन पक्षांमध्ये आलबेल आहे की नाही अशी चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. शिंदे हे अमित शाह यांना भेटल्याच्या बातम्या आल्या नंतर अशी भेट झालीच नसल्याचा दावा शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी २४ तासानंतर केला.
नोटीस मिळाली की नाही?
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना खा.श्रीकांत शिंदे यांना आणि स्वत:लाही प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्याचे सांगितले पण काहीच मिनिटांत ते पुन्हा माध्यमांसमोर आले आणि शिंदे यांना नोटीस मिळाल्याची आपल्याला माहिती नाही, असे ते म्हणाले. ‘आपल्याला अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही’ असा खुलासा खा.शिंदे यांना एक्सवर करावा लागला.
हॉटेलचे टेंडर प्रकरण
संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल वेदांतच्या टेंडर प्रक्रियेत नियम डावलून सहभाग घेतल्याच्या मुद्द्यावरून दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत गोंधळ झाला. तेव्हा या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने शिंदेसेनेचे मंत्री असलेले शिरसाट पुन्हा चर्चेत आले.
संजय गायकवाड यांची गुंडागर्दी
बुलडाण्याचे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात केलेली मारहाण महायुती सरकारसाठी अडचणीचा विषय ठरली. एखाद्या आमदाराने अशा पद्धतीने कायदा हाती घेण्यावर टीकेची झोड उठली. गायकवाड यांनी या मारहाणीचे समर्थन केल्याने ते सोशल मीडियात प्रचंड ट्राेल झाल्याचे दिसून आले.