"मूर्ख माणसावर काय बोलणार? निवडणूक आली की हे..."; निशिकांत दुबेंवर शिंदे गटाचा प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:33 IST2025-07-08T18:30:29+5:302025-07-08T18:33:21+5:30
निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली.

"मूर्ख माणसावर काय बोलणार? निवडणूक आली की हे..."; निशिकांत दुबेंवर शिंदे गटाचा प्रहार
Pratap Sarnaik On Nishikant Dubey: झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. उत्तरेत या तुम्हाला उचलून आपटतील, असं विधान निशिकांत दुबे यांनी केलं. दुबेंच्या या विधानावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार टीका केली. निशिकांत दुबेंच्या या विधानावर शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली. हे लोक निवडणूक आली की अशाप्रकारे विधानं करतात, अशी प्रतिक्रिया मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो अशा प्रकारची विधाने केली. "देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राचे योगदान काय, असा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्र कुणाच्या पैशांची भाकरी खातो? तिकडे टाटा, बिर्ला व रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता?" अशा शब्दात निशिकांत दुबेंनी गरळ ओकली. तसेच "उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष्य करत आहेत. तुम्हाला मारायचे असेल तर मग मुंबईतील तामिळी, तेलुगू आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा. आम्ही मराठीचा सन्मान करतो; पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही," असंही दुबे यांनी म्हटलं.
"निशिकांत दुबे यांनी केलेल्या विधानावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशा लोकांवर बोलण्याची गरज नसल्याचे म्हटलं. निशिकांत दुबेंसारख्या मूर्ख आणि उल्लू माणसावर काय बोलणार? हे लोक उत्तर प्रदेश बिहारची निवडणूक आली की अशाप्रकारे विधानं करतात, अशा लोकांवर बोलायाची काहीही गरज नाही, या लोकांबद्दल बोलायची माजी इच्छाही नाही," असं प्रताप सरनाईक म्हणाले.
"महाराष्ट्र, मराठीच्या पराक्रमाची साक्ष जगभर आहे. त्यांनी मराठी माणसाच्या कर्तृत्वावर, कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. कुणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगू शकत नाही. मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसावर अन्याय होऊ नये या सरकारच्या भूमिका आहेत. देशाच्या विकासदरात मराठी माणसाचे योगदान काय आहे हे माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला त्याची माहिती पाठवू," अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली.