Maharashtra Politics: सत्तारांनंतर शिंदे गटातील आणखी एका नेत्याची शिवराळ भाषा; अनिल परबांवर टीका करताना जीभ घसरली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 15:32 IST2022-11-08T15:28:44+5:302022-11-08T15:32:07+5:30
Maharashtra News: अब्दुल सत्तारांच्या विधानावरुन राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिंदे गटातील एका नेत्याने अनिल परब यांच्यावर अभद्र भाषेत टीका केली.

Maharashtra Politics: सत्तारांनंतर शिंदे गटातील आणखी एका नेत्याची शिवराळ भाषा; अनिल परबांवर टीका करताना जीभ घसरली!
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील नेते आणि मंत्री आक्षेपार्ह विधाने करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाली असून, तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे गटात अर्वाच्य भाषेत टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये आणखी एकाची भर पडली असून, ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे अनिल परब यांच्यावर टीका करताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली. अनिल परब यांच्याविरोधात दापोलीत गुन्हा नोंद झाल्यानंतर रामदास कदम यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली.
अनिल परब यांना अजूनपर्यंत अटक का केली जात नाही?
माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना अजून पर्यंत अटक का केली जात नाही असा सवाल रामदास कदम यांनी केला. अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले. त्यांना लवकर अटक करायला हवी. दापोली-मंडणगडची नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. ही नगरपालिका त्यांनी राष्ट्रवादीच्या घशात घातली. माझा मुलगा योगेश कदमला परब यांनी खूप त्रास दिला. उद्धव ठाकरे यांनाही अशीच माणसे आपल्याभोवती लागतात. सुभाष देसाई हे उद्धव यांचे कान भरतात, या शब्दांत रामदास कदम यांनी घणाघाती टीका केली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोके देतात. पण ते जनतेच्या विकासकामांसाठी देत असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान रामदास कदम यांनी दिले आहे. तसेच पक्ष फुटला तरी चालेल पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली होती, असा मोठा दावा रामदास कदम यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"