केंद्राच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठीच साेमय्यांची ढाल - नाना पटाेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 19:08 IST2021-09-26T19:08:00+5:302021-09-26T19:08:28+5:30
Nana Patole critisized BJP : सामान्य जनतेचे लक्ष विचलित व्हावे याकरिताच साेमय्यांचा ढालीसारखा वापर केला जात असल्याचा आराेप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला.

केंद्राच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठीच साेमय्यांची ढाल - नाना पटाेले
अकाेला : केंद्रातील माेदी सरकार हे शेतकरी, कामगार व बेराेजगारांच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहे. महागाईने सामान्य व्यक्ती हाेरपळून निघत आहे. हे सर्व अपयश झाकण्यासाठीच भाजपाने प्रत्येक राज्यात किरीट साेमय्या यांच्यासारखी उपद्रवी माणसे पेरली आहेत. सामान्य जनतेचे लक्ष विचलित व्हावे याकरिताच साेमय्यांचा ढालीसारखा वापर केला जात असल्याचा आराेप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी ते अकाेल्यात दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. पटाेले म्हणाले की, विराेधक आराेप करत असतात. ताे त्यांच्या अधिकारच आहे. मात्र, साेमय्यांना समाेर करून भाजपाने खालच्या पातळीवरच राजकारण सुरू केले आहे. हा सर्व प्रकार केंद्रातील अपयश झाकण्यासाठीच असल्याचा घणाघात त्यांनी केला. दाेषींवर कारवाई झालीच पाहिजे. त्याची पाठराखण करण्याचा प्रश्नच नाही. मात्र, सुपारी घेतल्यासारखे आराेपांचे सुरू असलेले सत्र पाहता भाजपाची ही खेळी असल्याचेही ते म्हणाले. केंद्राचे अपयश जनतेपर्यंत पाेहोचविण्यासाठी उद्याच्या बंद माध्यमातून केंद्र सरकारविरोधात नवी लढाई सुरू करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.