"परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला"; उपमुख्यमंत्र्यांनी चपळगावकर यांना वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:34 IST2025-01-25T10:33:42+5:302025-01-25T10:34:31+5:30
चपळगावकर यांचे शनिवारी पहाटे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले

"परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला"; उपमुख्यमंत्र्यांनी चपळगावकर यांना वाहिली आदरांजली
Ajit Pawar on Narendra Chapalgaonkar passed away : माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी पहाटे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. न्यायमूर्ती चपळगावकर हे वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी विपुल प्रमाणात वैचारिक लेखन केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी वृत्तपत्रातूनही दीर्घकाळ लेखन केले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि भक्ती, सायली व मेघना या तीन मुली व एक मुलगा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
"ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे. कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. देशाचा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी लिहिलेलं 'गांधी आणि संविधान' पुस्तक संविधान आणि गांधीविचारांचं अलौकिक दर्शन घडवणारं आहे. वर्ध्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात साहित्यिक आणि राजकीय नेतृत्वं दोघांच्याही जबाबदाऱ्यांवर त्यांनी केलेलं भाष्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे. आदरणीय नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.
सुप्रिया सुळे यांनीही व्यक्त केल्या भावना
"महाराष्ट्राचे वैभव असणारे आदरणीय न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. साहित्य आणि न्यायक्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. लोकशाहीची मूल्ये जनमानसांत रुजविण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी अनेक व्याख्याने देखील दिली. वर्धा येथे भरलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे एक प्रखर व्यासंगी, समतावादी आणि लोकशाहीवर दृढ श्रद्धा असणारे आदरणीय व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत," असे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले.