शरद पवारांनी देशहिताच्या विकासासाठी मोदींसोबत यावे - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:51 IST2025-06-17T16:50:57+5:302025-06-17T16:51:36+5:30
राज ठाकरे यांना युतीत येण्यास विरोध

शरद पवारांनी देशहिताच्या विकासासाठी मोदींसोबत यावे - रामदास आठवले
जत : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जर २०१४ सालीच एनडीएसोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते. अजूनही शरद पवारांनी देश हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत यावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, शरद पवार यांनी महाराष्ट्राचे नाव देशाच्या राजकारणात पुढे नेले आहे. राज्याच्या आणि देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेसोबत यावे. त्यांच्या पक्षाचे बहुतांशी आमदारदेखील सत्तेत जाण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यादृष्टीने निर्णय घ्यायला हवा.
यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, रिपाइंचे नेते संजय कांबळे, जगन्नाथ ठोकळे, अशोक गायकवाड, परशुराम वाडेकर, संजय एम. पाटील आदी उपस्थित होते.
रिपाइंला सत्तेत वाटा हवा
एनडीएने मला केंद्रात संधी दिली असली तरी राज्यात माझ्या पक्षावर अन्याय होतोय, ही बाब खरी आहे. मागच्या बारा वर्षांपासून विधान परिषदेवर संधी दिली नाही. महामंडळात संधी नाही; परंतु यावर आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी ठोस चर्चा सुरू आहे. येत्या स्थानिक स्वराज संस्था, महापालिका, नगरपालिका येथे आम्हाला जागा हव्या आहेत. जर नाही मिळाल्या तर आम्ही जिथे आमची ताकद आहे, तिथे स्वबळावर लढू. सांगली जिल्हा नियोजन समितीसाठी आम्ही दोन नावे दिली आहेत. महामंडळावरच्या काही नियुक्त्यांसाठीही नावे दिली आहेत.
राज ठाकरे यांना युतीत येण्यास विरोध
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे. भलेही ते दोघे एकत्र आले तरी मुंबई महापालिका आणि राज्यात त्यांच्या युतीचा कसलाही परिणाम होणार नाही. लोकसभेला भाजपने राज यांना सोबत घेतले होते; परंतु त्यांचा फायदा एनडीएला झालेला नाही. शिवाय राज ठाकरे यांना तर महायुतीत येण्यास माझ्या पक्षाचा कायमच विरोध असून, तो आजही कायम आहे.