राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:58 IST2025-06-26T19:57:53+5:302025-06-26T19:58:18+5:30

Sharad Pawar News: हिंदी सक्तीचा विषय कुणी एक पक्ष हाती घेऊ शकत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

sharad pawar reaction over will you join raj thackeray morcha about hindi compulsory in state | राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”

राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”

Sharad Pawar News: पहिली इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकविण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीविरोधात विरोधक एकटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही हिंदी सक्तीवरून आक्रमक झालेली दिसत आहे. सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत एका मोठ्या मोर्चाची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही हिंदी सक्तीवरून सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभागी होणार का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. 

पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नकोच. सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. तसेच हिंदी विरोधापेक्षा प्रथम मी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) पाहतो. कारण, एआयचे फायदे आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांना एआयचे शिक्षण मिळावे, याची काळजी घेतली पाहिजे, असे शरद पवार यांनी नमूद केले. 

राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का?

मोर्चाबाबत मला अजून कोणी सांगितलेले नाही. मी ठाकरे बंधूंचे स्टेटमेंट पाहिले आहे. ते काहीही चुकीचे बोलले नाहीत. कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नको, हे त्यांनी सांगितले. हिंदी सक्तीचा विषय कुणी एक पक्ष हाती घेऊ शकत नाही. आम्ही अन्य पक्षांशी बोलणार आहोत. आमचा विचार नकारात्मक नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. याच मुद्द्यावरून आता मनसे रस्त्यावर उतरणार असून, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार आहे.

 

Web Title: sharad pawar reaction over will you join raj thackeray morcha about hindi compulsory in state