१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 14:09 IST2025-07-12T14:09:41+5:302025-07-12T14:09:58+5:30
Sharad Pawar: इतिहास जिवंत ठेवायचा असेल, तर केवळ स्मरणात नव्हे, तर कृतीतही तो उतरवायला हवा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
Sharad Pawar: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडकी भरविणारे साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदूर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी दिली. याबाबत संपूर्ण राज्यभरातून आनंद व्यक्त केला जात आहे.
शिवरायांच्या किल्ल्यांना मोठा इतिहास आहे. त्यातील विजयदूर्ग, सिंधुदूर्ग, खांदेरीसारखे सागरी किल्ले मराठेशाहीच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझालखान याचा केलेला वध ही घटना देशविदेशातील इतिहासकारांनी त्याकाळातही महत्वाची मानून नोंदविली होती. पन्हाळगडावर मराठा इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत.
प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी बातमी
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची साक्ष देणारे राज्यातील ११ आणि तामिळनाडूतील 'जिंजी' किल्ला अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची बातमी प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी आहे. हा केवळ ऐतिहासिक सन्मान नाही, तर हे आपल्या स्वराज्याच्या साक्षीदार गडकिल्ल्यांचे जागतिक महत्त्व अधोरेखित करणारे गौरवचिन्ह आहे. आता छत्रपतींचा इतिहास केवळ आपल्या पाठ्यपुस्तकांपुरता न राहता, जागतिक अभ्यासाचा विषय होणार आहे. पण या गौरवाच्या पार्श्वभूमीवर एक जबाबदारीही आपल्या सर्वांवर येते ती म्हणजे गडकिल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि सन्मानपूर्वक देखभाल. इतिहास जिवंत ठेवायचा असेल, तर केवळ स्मरणात नव्हे, तर कृतीतही तो उतरवायला हवा. कारण, संवर्धनाशिवाय वारसा केवळ आठवण बनून राहतो. या ऐतिहासिक यशाबद्दल भारत सरकार, पुरातत्व विभाग आणि इतिहास अभ्यासकांचे मनःपूर्वक आभार!, अशी पोस्ट शरद पवार यांनी एक्सवर केली आहे.
दरम्यान, या उपलब्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वतः विविध राजदूतांशी संपर्क केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनीही साथ दिली. मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः जाऊन युनेस्कोच्या महासंचालकांची भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केले. अपर मुख्य सचिव विकास खारगे, तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची साक्ष देणारे राज्यातील ११ आणि तामिळनाडूतील 'जिंजी' किल्ला अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची बातमी प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 12, 2025
हा… pic.twitter.com/IOT0IHSL41