"BCCIचे अध्यक्ष राहिलेले शरद पवार बहुतेक सचिन तेंडुलकरबरोबर ओपनिंगला यायचे"; भाजपाचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 15:54 IST2022-07-03T15:53:44+5:302022-07-03T15:54:06+5:30
शरद पवारांनी केलेल्या विधानावरून भाजपाचे प्रत्युत्तर

"BCCIचे अध्यक्ष राहिलेले शरद पवार बहुतेक सचिन तेंडुलकरबरोबर ओपनिंगला यायचे"; भाजपाचा खोचक टोला
BJP Troll Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली. महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे वर्चस्व असल्याचे म्हटले जात होते. मात्र या वर्चस्वाला धक्का देताना भारतीय कुस्ती संघटनेकडून मोठी कारवाई करण्यात आली. नवी दिल्लीतील राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय झाला. यावर प्रतिक्रिया देताना, 'राजकीय लोकांनी क्रीडा क्षेत्रात हस्तक्षेप करू नये', असे म्हटले होते. त्यावरून भाजपाने पवारांना खोचक टोला लगावला.
महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त झाल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्रातील राजकारणाचा कुस्तिगीर संघटनेच्या बरखास्तीशी काहीही संबंध नाही. गेल्या काही दिवसांत कुस्तिगीर संघाच्या कामाबद्दल अनेक तक्रारी येत होत्या. त्यानंतर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना मी त्यात सुधारणा करण्यास सांगितले होते. पण मला असे वाटते की राजकीय क्षेत्रातील लोकांनी क्रीडा क्षेत्रातील बाबींमध्ये हस्तक्षेप न करणं हे अधिक उचित ठरेल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होते. मात्र शरद पवार हे स्वत: राजकारणात सक्रीय असूनही भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष होते. त्याशिवाय ते ICC म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचेही अध्यक्ष होते. त्यावरून भाजपाने त्यांना टोला लगावला. जर राजकीय लोकांचा क्रीडा क्षेत्रात हस्तक्षेप योग्य नसेल तर BCCI चे अध्यक्ष राहिलेले शरद पवार बहुदा सचिन तेंडुलकर बरोबर ओपनिंगला यायचे, असा खोचक टोला आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला.
BCCI चे अध्यक्ष राहिलेले शरद पवार बहुदा सचिन तेंडुलकर बरोबर ओपनिंगला यायचे. pic.twitter.com/W1k5UhhrbG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 3, 2022
शरद पवार हे भारतातील सर्वात लोकप्रिय असलेल्या क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित होते. शरद पवार हे BCCI आणि ICC यांसारख्या देशातील आणि जगातील सर्वोच्च अशा क्रिकेट बोर्डावर कार्यरत होते. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पक्षाचे खासदार म्हणून राजकारणातही सक्रीय होते. त्यामुळे शरद पवार यांनी केलेले विधान अतुल भातखळकरांना रूचले नाही. त्यामुळेच भातखळकरांनी पवारांना खोचक टोला लगावला.