अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 20:13 IST2026-04-06T20:11:24+5:302026-04-06T20:13:13+5:30
अशोक खरात प्रकरणावर शरद पवारांनी भाष्य केले. अशोक खरातशी राजकीय नेत्यांचेही संबंध असल्याचे समोर आले, त्याबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली.

अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
Sharad Pawar on Ashok Kharat Case: अनेक महिलांवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातसोबत राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले. यातील काही राजकीय नेत्यांचे खरातसोबत बोलणे होत होते, असे दावेही केले गेले आहेत. या सगळ्या प्रकरणावर बोलताना शरद पवारांनी खंत व्यक्त केली. त्यांनी स्वतःचे आयुष्यातील उदाहरण देत अशा नेत्यांना खडेबोल सुनावले.
शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. त्यांना अशोक खरात प्रकरणाबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील उदाहरणं देत भाष्य केले.
मी दोन-तीन ठिकाणी जातो, पण...
पवार म्हणाले, "तुम्ही मला कधीपासून ओळखता? कधी गंडा हाता आहे, कुठे काही आहे का? मी दोन-तीन ठिकाणी जातो. पंढरपूरला गेलो की, पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो की, तुळजाभवानीचं दर्शन घेतो. माझी काही महत्त्वाची योजना असेल, निवडणूक असेल, तर कान्हेरी नावाचं गाव आहे. ते माझं गाव आहे. तिथल्या मारुतीच्या मंदिरात मी जातो. पण जिथे जातो त्याची जाहिरात करत नाही."
"आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाटावी असे चित्र आहे. कारण खरात बाबानंतर मी काल वाचलं की आणखी कुणीतरी बाबा आलाय. आणि आज वाचलं की कोणीतरी मंत्री आज बाबा आणायला चालले आहेत. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात होत आहे", अशी चिंता पवारांनी व्यक्त केली.
"एका बाजूला शाहू-फुले-आंबेडकर बोलायचे आणि अशा बाबांसोबत आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही करतात ते या सगळ्या विचाराशी विसंगत आहे", अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रासाठी हे अशोभनीय
"माझ्या वाचनात आलं की, कोणी किती कॉल केले. त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्या अनेकजणांमध्ये समाजात किंवा राजकारणात एक स्थान भूषवणारे लोकही आहेत. माझ्या मते ही चिंतेची बाबा आहे. अशा पदावर बसलेले लोक अशा सगळ्या कामात कित्येकदा सहभागी होतात, हे चित्र महाराष्ट्राल अशोभनीय आहे", असे शरद पवार म्हणाले.