मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:07 IST2025-05-02T11:05:48+5:302025-05-02T11:07:53+5:30
Maharashtra Farmer Success Story News: शरद पवार यांनी सुरू केलेल्या एका योजनेतून प्रेरणा घेऊन या शेतकऱ्याने वजनदार आंब्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. 'शरद मँगो' या नावाने या आंब्याला पेटंटही मिळाले आहे.

मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
Maharashtra Farmer Success Story News: महाराष्ट्रात विविध प्रकारचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रातील शेतकरी प्रयोगशील असतात. महाराष्ट्रात शेतीतील अनेक प्रकारचे प्रयोग यशस्वी करून दाखवले आहेत. आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आताच्या घडीला आंब्याचा सीझन सुरू आहे. यातच एका मराठमोळ्या शेतकऱ्याने तीन किलो वजन असलेल्या आंब्याचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे या आंब्याला या शेतकऱ्यांने शरद पवार यांचे नाव दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील एका शेतकऱ्याने आपल्या बागेत तब्बल ३ किलो वजनाचे आंबे पिकवले आहेत. विशेष म्हणजे या वजनदार आंब्याला 'शरद मँगो' असे नाव दिले आहे. हा आंबा पाहण्यासाठी सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक येत आहेत. वजनदार आंब्याचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या शेतकरी बांधवाचे नाव दत्तात्रय घाडगे असे आहे. घाडगे यांचा 'शरद मँगो' चांगलाच भाव खात आहे.
'शरद मँगो'ची खासियत काय?
या नव्या प्रकारच्या आंब्याची खासियत म्हणजे केवळ त्याचे वजनच नाही, तर त्यामागील संशोधनात्मक शेतीही आहे. घाडगे यांनी आपल्या आठ एकर शेतात १७ विविध प्रजातींची आंब्याची झाडे लावली आहेत. त्यात ग्राफ्टिंग करून या प्रजाती विकसित केल्या आहे. विशेष म्हणजे, फळ बाग योजना या सरकारी योजनेचा लाभ घेत त्यांनी हा शेतीतील प्रयोग केला आहे. याच अनोख्या वजनदार आंब्याला शरद मँगो नाव दिले आहे. तर असेच एक वेगळेपण असलेल्या आंब्याला त्यांना पेटंट मिळाले असून, त्याचे नाव संत सावता माळी असे ठेवण्यात आले आहे.
'शरद मँगो' महाराष्ट्राची नाही, तर देशाची ओळख बनू शकतो
सन १९९२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळ बाग योजनेच्या आधारे दत्तात्रेय घाडगे यांनी आंबाच्या प्रयोगाला सुरू केली. त्यामुळे शरद पवारांच्या पूर्वपरवानगीने तब्बल ३ किलोच्या वजनदार आंब्याला 'शरद मँगो' असे नाव देण्यात आले तसे पेटंट त्यांना मिळाले. दत्तात्रय घाडगे यांना खात्री आहे की, 'शरद मँगो' भविष्यात महाराष्ट्राचाच नाही, तर देशभरातील ओळख बनू शकतो. तसेच शेतकऱ्यांना त्यातून एकरी २५ लाखांचे उत्पन्न मिळू शकते. विविध भागात हे पीक चांगल्या पद्धतीने घेतल्यास भविष्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखता येऊ शकतात, असा विश्वास दत्तात्रय घाडगे यांनी व्यक्त केला.