शंभूदेवासाठी ५० टन भस्माची निर्मिती !

By Admin | Updated: March 23, 2015 00:33 IST2015-03-22T22:52:26+5:302015-03-23T00:33:50+5:30

शिखर शिंगणापूरची मंगळवारपासून यात्रा : पूजेसाठी लागणारे साहित्य बनविण्यासाठी परिसरातील बचतगटांची लगबग--लोकमत विशेष...

Shambhu devastated 50 ton bhasmaa! | शंभूदेवासाठी ५० टन भस्माची निर्मिती !

शंभूदेवासाठी ५० टन भस्माची निर्मिती !

शरद देवकुळे - पळशी --महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभूमहादेवाची यात्रा मंगळवार, दि. २४ पासून सुरू होत आहे. महादेवाच्या पूजेसाठी लागणारा भस्म आणि दावणा याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने यात्रेत या पूजा साहित्याची मोठी उलाढाल होते. सध्या परिसरात तीस ते चाळीस भट्ट्यांमधून सुमारे ५० टन भस्म तयार करण्यात आला आहे.
शंभूमहादेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिखर शिंगणापूर येथे हजेरी लावतात. दि. २४ ते दि. ४ एप्रिलअखेर होणाऱ्या यात्रेची तयारी सुरू झाली आहे. गावपरिसरात भस्म तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी लागणारा कच्चा माल सांगली जिल्ह्यातील जत येथून आणला जातो. भस्म तयार करण्यासाठी पांढरी खडी, नारळाचे केशर, सुगंधी तेल यांचा वापर केला जातो. सुरुवातीला खडी भट्टीमध्ये भाजून घेतली जाते. पावडर झाल्यानंतर त्यात पाणी मिसळून साच्याच्या साह्याने छोट्या वड्या तयार केल्या जातात. त्यानंतर कडक उन्हात त्या सुकविल्या जातात. अशी प्रक्रिया करून तयार झालेला भस्म शिंगणापूर यात्रेत विक्रीसाठी पाठविला जातो.शंभूमहादेवाच्या पूजेसाठी दावणाही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. सुगंधी दावण्याची शेती येथील शेतकरी करत असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेतातील दावणा काढून त्याच्या जुड्या बांधून सुकवून ठेवल्या जातात. भस्म आणि दावणा याची मोठी उलाढाल शिंगणापूर यात्रेत होत असते. दोन लाखांच्या भांडवलातून बचतगटांना वर्षाकाठी सर्व खर्च वजा जाता एक ते दीड लाखाचा नफा होतो.

भस्म विक्रीतून लाखोची उलाढाल
शंभूमहादेवाच्या पूजेसाठी भस्म महत्त्वाचा मानला जातो. याचे धार्मिक महत्त्व जास्त असल्यामुळे परिसरात भस्मनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. परिसरात तीस ते चाळीस भस्म बनविण्याच्या भट्ट्या आहेत. या भट्ट्यांच्या माध्यमातून सुमारे ४० ते ५० टन भस्म तयार होतो. यात्राकाळात भस्म विक्रीतून सुमारे १८ ते २० लाखांची उलाढाल होते. येथील भस्म केमिकल विरहीत असल्यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम होत नाही, असे व्यावसायिक सांगतात.

औषधी दावण्याची शेती
शंभूमहादेवाला बेल, दावणा व भस्माची आवड असल्याने यात्रेत याची मोठी विक्री होते. दावणा हा आरोग्यदायी आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पित्तनाशक म्हणूनही याचा उपयोग केला जातो. यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुमारे २० एकर क्षेत्रावर दवण्याचे उत्पादन घेतले जाते. हे पीक तीन महिन्यांचे असते. दवण्याची एक जुडी पाच रुपयांना विकली जाते. साधारणपणे एकरी ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शासनाने अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिल्यास आम्ही चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करू शकतो. कच्चा माल, मजुरी, भांडवलाचा अभाव यामुळे अनेक अडचणी येतात.
- बाळूबाई जाधव, अध्यक्षा, बचतगट

असा तयार होतो भस्म

भस्म तयार करण्यासाठी जत येथून कच्चा माल आणला जातो. भस्माची खडी नारळाच्या केशरात भट्टीत भाजली जाते. त्यानंतर मजुरांकरवी ती बारीक वाटून घेतली जाते. तयार झालेली पावडर एक दिवस पाण्याच्या हौदात भिजत ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी खडे बाजूला काढून घट्ट पिठाच्या साच्याच्या साह्याने वड्या तयार केल्या जातात. या वड्या उन्हात चांगल्या वाळविल्या जातात. त्यानंतर चाळणीवर घासून योग्य आकार दिला जातो.

Web Title: Shambhu devastated 50 ton bhasmaa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.