शक्तिपीठ महामार्गाला अखेर हिरवा कंदील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 05:53 IST2025-01-14T05:52:54+5:302025-01-14T05:53:28+5:30

राज्यातील शक्तिपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करावयाची असून त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले. 

Shaktipeeth Highway finally gets green light, CM Fadnavis gives instructions | शक्तिपीठ महामार्गाला अखेर हिरवा कंदील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश 

शक्तिपीठ महामार्गाला अखेर हिरवा कंदील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश 

मुंबई : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी हिरवा कंदील दाखवला. तसेच मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारत उभारण्याच्या कामाची सुरुवातही येत्या शंभर दिवसात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या सरकारच्या या महत्त्वाकांक्षी महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करावे, असे निर्देश फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत दिले. राज्यातील शक्तिपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करावयाची असून त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले. 

बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

सर्वच महामार्ग चर्चेत 
समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम टप्प्याचे आमणेपर्यंतचे ७६ किमी लांबीचे काम तत्परतेने पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. समृद्धी महामार्गाची कर्ज रोखे प्रक्रिया यावर्षी पूर्ण करावी. 
मुबंई-पुणे द्रुतगती मार्गावरील १३.३० किमी लांबीच्या मिसिंग लिकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे. नाशिक- मुबंई राष्ट्रीय महामार्गात सुधारणा करण्याचे कामही तातडीने पूर्ण करावे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Shaktipeeth Highway finally gets green light, CM Fadnavis gives instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.