“काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ”; शहाजीबापूंची खास शैलीत प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 17:43 IST2023-05-11T17:42:10+5:302023-05-11T17:43:30+5:30
Maharashtra Politics: संजय राऊतांनी केलेल्या एका ट्विटवर शहाजी बापू पाटील यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले.

“काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ”; शहाजीबापूंची खास शैलीत प्रतिक्रिया
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अखेर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात निरीक्षण नोंदवताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट, राज्यपालांवर ताशेरे ओढले मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत विधासभा अध्यक्ष निर्णय घेतील, असे सांगितले. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारला धोका नसल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. संजय राऊत यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या स्टाईलमध्ये ट्विट केले होते. त्यावर आता खुद्द शहाजीबापूंनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पक्षातल्या ४० आमदारांना घेऊन ते सुरत, गुवाहाटी आणि गोव्यात गेले. आमदार शहाजी बापू पाटील सुद्धा शिंदे गटात होते. शहाजी बापू पाटील यांचा एक डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता. काय झाडी, काय डोंगार, सगळं ओक्के आहे, असे शहाजीबापू म्हणाले होते. याची ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली होती.
काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ
सत्तासंघर्षाच्या निकालाआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एक ट्विट केले होते. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवळ… जय महाराष्ट्र!” असे संजय राऊत यांनी यात म्हटले होते. यावर, काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ, आता झिरवळ गेला झुरळ हुडकायला, संजय राऊत चालला आता गुवाहाटीच्या झाडांत बसायला, अशी खोचक प्रतिक्रिया शहाजी बापू पाटील यांनी दिली.