सत्तर दिवसांचा दिंडी ‘योग’
By Admin | Updated: June 7, 2015 02:05 IST2015-06-07T02:05:32+5:302015-06-07T02:05:32+5:30
साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या बीड शहरातील प्रत्येक घरात योग पोहोचविण्यासाठी सलग ७० दिवस दररोज योग शिबिराचे आयोजन

सत्तर दिवसांचा दिंडी ‘योग’
प्रताप नलावडे , बीड
साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या बीड शहरातील प्रत्येक घरात योग पोहोचविण्यासाठी सलग ७० दिवस दररोज योग शिबिराचे आयोजन शहराच्या विविध भागांत करीत येथील पतंजली योगपीठाचे प्रांत प्रभारी अॅड. श्रीराम लाखे यांची वाटचाल एका वेगळ्या विक्रमाकडे सुरू आहे. दीडशे योग शिक्षकांची टीम ‘योग दिंडी’साठी दिवसरात्र राबताना दिसत आहे.
कधी भ्रूणहत्येचा मामला तर कधी गांजाची शेती अशा अनेक कारणांमुळे राज्यभरात बीड जिल्ह्याची मलीन झालेली प्रतिमा आणि त्यामुळे जिल्ह्याकडे लोकांचा बघण्याचा बदललेला दृष्टिकोन अशा सकारात्मक उपक्रमामुळे हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली आहे. ‘योग दिंडी तुमच्या दारी’ या अभिनव उपक्रमाने गेल्या ५० दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात एक वेगळा संदेशही गेला आहे.
अॅड. श्रीराम लाखे आणि त्यांच्या दीडशे योग शिक्षकांच्या टीमने शहरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत योग पोहोचविण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वी घेतला आणि त्यादृष्टीने तयारी सुरू केली. यासाठी नेमके काय केले पाहिजे, याचा विचार करताना ‘योग दिंडी’ची कल्पना आकाराला आली. शहरात एकाच ठिकाणी योग शिबिर घेण्यापेक्षा वेगवेगळ्या भागांत शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. काकू नाना प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी आर्थिक भार उचलला. विविध भागांतील १३ ठिकाणांची निवड करण्यात आली; आणि १५ एप्रिलला येथील मुक्ता लॉन्स या ठिकाणी पहिल्या पाच दिवसांच्या शिबिराची सुरुवात झाली. दररोज योग आणि प्राणायामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली. पहाटेपासून कार्यकर्त्यांचे हात रोज राबू लागले. मैदानाची साफसफाई करण्यापासून ते चटया टाकणे आणि त्यानंतर त्या उचलून ठेवणे, अशी सगळी कामे हसतमुखाने करत दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी करणारे कार्यकर्ते आणि योग शिक्षक पाहून लोकांचाही हुरूप वाढला. पहाटे ५ ते ७ असा दोन तासांचा प्रशिक्षण वर्ग असला तरी त्यामागे कार्यकर्त्यांच्या दिवसभराच्या श्रमाचेही महत्त्व आहे.
२१ जूनला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या योग दिंडीचा समारोप करण्यात येणार आहे. लोकांना योग साधनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अॅड. श्रीराम लाखे, अभियंता नाना ओझुरकर, रत्नाकर कुलकर्णी, नितीन गोफण, हेमा विभुते व त्यांच्या सहकार्यांनी ज्या भागात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तेथील लोकांना घरोघरी जाऊन याचे महत्त्व पटवून दिले. कधी पॅम्पलेटचे वाटप करत तर कधी रॅली काढून वातावरण निर्मितीही केली. जमेल त्या माध्यमाचा आधार घेऊन लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात ही मंडळी यशस्वी ठरली.
प्रत्येक शिबिरासाठी राज्यातील तज्ज्ञ मंडळींना प्रशिक्षणासाठी पाचारण करण्यात आले. यासाठी वेगवेगळे प्रशिक्षक येत असून, बीडच्या शिबिरासाठी गेलो होतो, असे हे प्रशिक्षक अभिमानाने सांगू लागले. शिबिरात शिस्तीचे काटेकोर पालन करण्यावर भर तर दिला जातोच, परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आहार आणि विहाराचे धडेही दिले जातात.