सात महिलांनी केले पतीला किडनीदान!
By Admin | Updated: March 15, 2015 02:18 IST2015-03-15T02:18:47+5:302015-03-15T02:18:47+5:30
अवयवदानाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांना कळले असून, सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सात महिलांनी पतीला किडनीदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत़

सात महिलांनी केले पतीला किडनीदान!
अवयवदानाचे महत्त्व पटले : सातही दाम्पत्ये जगताहेत निरोगी आयुष्य
नासीर कबीर - करमाळा (जि. सोलापूर)
अवयवदानाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांना कळले असून, सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सात महिलांनी पतीला किडनीदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत़ किडनीसारखा महत्त्वाचा अवयव देताना रक्ताचे नातेही पुढे येत नाही़, तेथे या महिलांनी पतीला आपली किडनी दान करून वस्तुपाठ घालून
दिला आहे़
करमाळा शहरातील अशोकलाल
बोरा, संजयकुमार देवी, अशोक क्षीरसागर,
दशरथ कणसे, अनिल कणसे, अजित मसलेकर व किरण सूर्यपुजारी या सात जणांना
वेगवेगळ्या कारणांमुळे किडनीचा आजार
जडला होता.
मानवी शरीराची प्रक्रिया निरंतर सुरू राहण्यासाठी प्रत्येक अवयव तसा महत्त्वाचाच असतो़ त्यातही किडनी तर मुख्य अवयव़ त्यालाच विकार जडला तर माणसाचा जीवच धोक्यात येतो़ पण तन आणि मनाने एकरूप झालेल्या जिवाला अर्ध्यावर कसे सोडणार,
या विवंचनेतूनच या महिलांनी पतीला किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला व तो प्रत्यक्षात आणला़
पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये या सातही जणांवर किडनी रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली़ सातही दाम्पत्ये आज उत्तम व निरोगी आयुष्य जगत आहेत.
आधुनिक सावित्री... संगीता अशोकलाल बोरा, सीमा संजयकुमार देवी, कमल दशरथ कणसे, सविता अनिल कणसे, स्वाती अजित मसलेकर, प्रतीक्षा किरण सूर्यपुजारी, प्रतीक्षा अशोक क्षीरसागऱ
स्त्रीच्या हृदयात माया, प्रेम, वात्सल्य व त्याग भरलेला आहे. जगाच्या पाठीवर आई, पत्नी, बहीण, मुलगी या नात्याची व्याख्या शब्दातीत आहे़ मला जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो़- अजित मसलेकर, रुग्ण
पती हाच परमेश्वर अशी धारणा मनात ठेवून किडनी दान केली़ यामुळे त्यांचे आयुष्य वाढले. मी स्वत:ला भाग्यवान व पुण्यवान समजते़- सविता कणसे