राज्यात एसटीचे सात विभाग पूर्णवेळ विभाग नियंत्रकांविना, परिवहन मंत्री लक्ष देणार का ?
By सचिन यादव | Updated: September 29, 2025 12:26 IST2025-09-29T12:24:49+5:302025-09-29T12:26:54+5:30
पूर्णवेळ विभाग नियंत्रकांची प्रतीक्षा

संग्रहित छाया
सचिन यादव
कोल्हापूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सात विभागांत पूर्णवेळ नियंत्रक नाहीत. त्यात कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, धुळे, जळगांव, नाशिक, मुंबई सेंट्रल विभागांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी यंत्र अभियंत्यावर (चालन) प्रभारी कार्यभार सोपविला आहे. मुंबई आणि पुणे प्रादेशिक विभागांकडून त्याबाबत हालचाली नसल्याने काही ठिकाणचा कार्यभार कोलमडला आहे.
कोल्हापूरच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांची पुणे प्रादेशिक व्यवस्थापकपदी पदोन्नती झाली. त्याच्या जागी सात महिन्यांच्या कालावधीसाठी शिवराज जाधव यांची पूर्णवेळ नियुक्ती झाली. मे २०२५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रभारी कार्यभार यंत्र अभियंता (चालन) यशवंत कानतोडे यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागात चार महिन्यांपासून पूर्णवेळ
विभाग नियंत्रकांची प्रतीक्षा आहे.
सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची तीन महिन्यांपूर्वी अमरावती प्रादेशिक व्यवस्थापक पदोन्नती झाली. त्यांचा तेथील कार्यभार यंत्र अभियंत्याकडे सोपविला आहे. सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक पदावर रायगडमधील एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. मात्र अद्याप त्यांनी कार्यभार स्वीकारलेला नाही. नाशिक, धुळे, जळगांव, मुंबई सेंट्रल या महत्त्वाच्या ठिकाणीही पूर्णवेळ विभाग नियंत्रकांची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या संदर्भात एसटी महामंडळाच्या पुणे प्रादेशिक विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
परिवहन मंत्री लक्ष देणार का ?
विभाग नियंत्रक सेवानिवृत्त होण्यापूर्वीच दोन दिवसांत नवीन विभाग नियंत्रकांची नियुक्ती महामंडळात केली जात होती. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्यात काही विभागात वर्षभर प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे एसटीचे धोरण, महत्त्वाचे निर्णय, प्रादेशिक कार्यालयाकडून येणाऱ्या आदेशाच्या अंमलबजावणी करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री आणि एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी लक्ष देण्याची मागणी विभागातून होत आहे.
राज्यात ज्या ठिकाणी विभाग नियंत्रकांची पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणी तत्काळ नियुक्ती करावी. एसटीचा कार्यभार सक्षमपणे होण्यासाठी हे एक महत्त्वाचे पद आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. - श्रीरंग बरगे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस