ज्येष्ठ लेखिका, कार्यकर्त्या प्रा. आशा आपराद यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:59 AM2019-08-23T11:59:30+5:302019-08-23T13:00:19+5:30

मुस्लिम समाजाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ लेखिका प्रा. आशा आपराद (६७) यांचे आज पहाटे तीन वाजता अल्पशः आजराने फुलेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती आणि चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Senior Writer, Activist Pvt. Asha Aparad dies | ज्येष्ठ लेखिका, कार्यकर्त्या प्रा. आशा आपराद यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका, कार्यकर्त्या प्रा. आशा आपराद यांचे निधन

Next
ठळक मुद्देज्येष्ठ लेखिका, कार्यकर्त्या प्रा. आशा आपराद यांचे निधनमुस्लिम समाजाच्या चळवळीत काम

कोल्हापूर : मुस्लिम समाजाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ लेखिका प्रा. आशा आपराद (६७) यांचे आज पहाटे तीन वाजता अल्पशः आजराने फुलेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती आणि चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बागल चौकातील दफनभूमीत त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी जियारत विधी आहे. त्यांचे जावई प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण, सुचेता कोरगांवकर, तनुजा शिपूरकर, प्रा. सुनीलकुमार लवटे, प्राचार्य रविंद्र ठाकूर, प्रा. जी. पी. माळी यांच्यासह जिल्हा महिला दक्षता समिती, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते, केएमसी कॉलेज, शहाजी कॉलेज, महावीर कॉलेजचे सहकारी प्राध्यापक आणि मुस्लिम समाजातील व्यक्ती अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.


आशा अपराद यांचे नाव कोल्हापुरातील सामाजिक वर्तुळात परिचयाचे आहे. त्यांनी प्रारंभी मुस्लिम सत्यशोधक समाज, अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि महिला दक्षता समितीच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे मूळ गाव आंबेवाडी होते. लहान वयात विवाह झाल्यामुळे त्या कोल्हापूरात बुधवार पेठेत वास्तव्यास होत्या. लहान वयात विवाह झाल्यामुळे होणारी परवड विशेषत: मुस्लिम समाजात होणारी घुसमट त्यांनी अनुभवली. त्यांच्या आयुष्याला वळण देण्यात शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.

प्राध्यापक म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात तीस वर्षे सेवा करुन त्या २0१२ मध्ये निवृत्त झाल्या. हिंदी विषयासोबतच त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना सामाजिक काम करण्याची प्रेरणा दिली. जेमतेम स्थिती असलेल्या कुटुंबातील एक सहनशील मुलगी ते मुस्लिम स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडणारे कर्ते सुधारक हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाची कार्यकर्ती आणि नंतर महिला दक्षता समितीची सदस्य असा त्यांचा प्रवास मोठ्या संघर्षाचा आहे.

मुमताज रहिमतपुरे यांच्या पाठीशी

मुस्लीम महिलांच्या प्रश्नांसाठी मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून उभारलेल्या चळवळीत काम केलेल्या आशा आपराद यांचाही विशेष उल्लेख करण्यात येतो. १९८५-८६ मध्ये कोल्हापूर ते नागपूर तलाकमुक्ती मोर्चात सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या मुमताज रहिमतपुरे या कार्यकर्त्यां, लेखिका यांचे आकस्मिक निधन झाले तेव्हा कोल्हापुरातील मुस्लीम लोकांनी त्या काफर आहेत, दफन करू देणार नाही अशी भूमिका घेतली, त्यावेळी झालेल्या चळवळीत आशा अपराध यांनी याविरोधात कणखर भूमिका घेतली होती.

'भोगले जे दु:ख त्याला' आत्मचरित्र

२00९ मध्ये त्यांनी 'भोगले जे दु:ख त्याला' हे आत्मचरित्र लिहिले. या आत्मचरित्राच्या रूपातून त्यांनी सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांच्या वाट्याला येणारी परवड ओघवत्या भाषेत अत्यंत संवेदनशीलतेने मांडले आहे. या आत्मचरित्राला भैरूरतन दमाणी प्रतिष्ठानने उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दलचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला.या पुस्तकाला मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ तसेच महाराष्ट्र सरकारच्या उत्कृष्ट वाडःमय निर्मितीचा राज्य पुरस्कारासह जवळपास १६ पारितोषिके मिळाली. 'सहा जो दु:ख मैने' या नावाने २0१६ मध्ये या पुस्तकाचा हिंदीत अनुवाद झाला.

दहावीच्या अभ्यासक्रमात त्यांनी लिहिलेल्या पन्हाळ्यावरील उरुसाविषयीचा लेख समाविष्ट करण्यात आला होता. याशिवाय माझं कोल्हापूर याविषयी अनेक स्फुटलेखन त्यांनी केले होते. सोलापूर विद्यापीठात बीएच्या अभ्यासक्रमात त्यांच्या 'भोगले जे दु:ख त्याला' हे पुस्तक अभ्यासाला आहे.

या आत्मचरित्रात त्यांनी सहन केलेल्या दु:खांचे आणि पार केलेल्या संकटांचे प्रतिबिंब आहे. जन्मदात्या आईचा केवळ रागराग आणि दुस्वास, आपल्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असणाऱ्या आणि वृत्तीने काहीशा कोरड्या असलेल्या पतीबरोबरचा संसार, त्यातही जिद्दीने स्वत: शिकणाऱ्या आणि आपल्या मुलींनाही शिकवणाऱ्या आशा आपराध यांचे आयुष्य म्हणजे चिकाटीची आणि जिद्दीची कहाणी आहे.

मराठी मुसलमानांचे जग, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या स्त्रियांच्या आशाआकांक्षा, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण उर्दूमिश्रीत मराठी हे सारे या पुस्तकातून जिवंत होत जाते. जेमतेम स्थिती असलेल्या कुटुंबातील एक सहनशील मुलगी ते मुस्लिम स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडणारे कर्ते सुधारक हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाची कार्यकर्ती आणि नंतर महिला दक्षता समितीची सदस्य असा त्यांचा प्रवास मोठ्या संघर्षाचा आहे. या वाटचालीतील त्यांना त्यांच्या वडिलांची साथ मिळाली. साधे आणि सामान्य आयुष्य जगणाऱ्या आशाताईंचे पती नंतर त्यांना समजून घेउ लागले, हे केवळ आशाताईच्या आणि मुलींच्या शिक्षणामुळे घरात झालेल्या बदलांमुळे. आशाताईंच्या आयुष्याला वळण देण्यात शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्यासह कोल्हापुरातील प्रगत सामाजिक चळवळींचे अनेक उल्लेख आशातार्ईनी कृतज्ञतेने केले आहे.

विझू देउ नकोस आशेच्या पणतीला

त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या जन्मापासून नाही तर माझ्या जन्माअगोदरही माझ्या अस्तित्वावर नकारात्मक शब्दांचे आसूड ओढले गेले. पांढऱ्या पायाची, अपशकुनी, काळी, कुरूप, काळ्या जिभेची अशी कितीतरी अभद्र लेबल मला लावली गेली. अनेक घटनांना, परिस्थितीला मलाच जबाबदार धरून माझा छळ केला. जन्मदात्री आई असूनही माझ्या आसवांनी तिचं हृदय कधीही हेलावलं नाही. माझी प्रत्येक आशा, आकांक्षा, भावना, हक्क, अधिकार आपल्या टाचेखाली ती तुडवत आली. माझं अख्खं आयुष्य जणू तिनं आपल्यासाठी एक वस्तू मानली. केवळ एक वस्तू, जी गहाण ठेवून त्यावर कर्ज काढता येतं. स्वत:साठी, स्वत:च्या गरजपूर्तीसाठी. मानं माझं आयुष्य आपल्याकडं गहाण ठेवलं. मला माझ्या गुलामीची प्रखरतेनं जाणीव झाली. यातून आपण सुटायला हवं, नव्हे सुटका करून घ्यायला हवी. घाबरू नकोस, कितीही वादळ होऊ दे, विझू देऊ नकोस त्या आशेच्या पणतीला. आत्ता हरलीस तर मग पुढं कधीच नाही. कधीही नाही. मी स्वत:ला पुन:पुन्हा बजावत होते. स्वत:च स्वत:ला धीर देत होते.


महिला दक्षता समितीतील माझ्या मार्गदर्शक, अतिशय संवेदनशील, कवी मनाच्या लेखिका, प्रा. आशा आपराद यांचे निधन झाले. खूप मनाला वेदना देणारी ही घटना आहे. आशाताईंच्या तब्येतीच्या तक्रारी होत्या, पण त्यातूनही त्या बुधवारी महिला दक्षता समितीत येऊ लागल्या होत्या. मी त्यांना नेहमी म्हणायची, आशाताई महिला दक्षता समिती हे तुमच्या तब्येतीसाठी चांगलं औषध आहे. तुम्ही त्या संस्थेमध्ये प्राण ओतलेला आहे. तुम्ही इथे आलात की तुम्हाला बरं वाटणार. तुम्ही येत राहा. मग त्या यायच्या. मध्येच त्यांची तब्येत बिघडली की त्या म्हणायच्या तनुजा गाडी आता जुनी झाली गं. सारखी गॅरेजला असते बघ. एखादा पार्ट दुरुस्त झाला की दुसरा खिळखिळा होतोय. मग पुन्हा गाडी गॅरेजला जाते. जरा चांगली होऊन बाहेर आली की मग सुरू होईल नीट. असं त्या स्वत:बद्दल म्हणायच्या. खूप संवेदनशील. महिला दक्षता समितीतील प्रत्येक महिलेच्या प्रश्नांमध्ये त्या अगदी तळमळीने भाग घ्यायचा आणि मग त्यांना त्याचा त्रास व्हायचा. अतिशय चांगल्या समुपदेशक. ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नांची तर त्यांना खोलवर माहिती कारण स्वत: त्यांनी जे दु:ख भोगलेले होतं त्यामुळे त्यांना पटकन त्यांची दु:खं कळायची. म्हणींचा वगैरे आधार घेऊन त्या कौन्सिलिंग करायच्या. अगदी मनापासून. भोगले जे दु:ख त्याला हे त्यांचं आत्मचरित्र खूप गाजलं. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. सच्ची कार्यकर्ती हरपली याची खूप वेदना आहे.
तनुजा शिपूरकर,
कोल्हापूर


अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. मुस्लिम समाजात लहान वयात लग्न झाल्यानंतर जे दु:ख भोगावे लागते, त्याचा अनुभव घेत याच विषयावर त्यांनी पुढे काम केले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी केएमसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तळागाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुस्तकी शिक्षणासोबतच त्यांनी समाजातील शिक्षण दिले. विशेषत: मुलींनी कणखरपणे समाजात कसे राहिले पाहिजे यावर त्यांचा भर होता. विद्यार्थ्यांच्या गराड्यात असणाºया आशातार्इंची विद्यार्थ्यांना भीती न वाटता कायम आदरच वाटत आला.
- विश्वास तडसरे,
सेवानिवृत्त प्राध्यापक, सहकारी

Web Title: Senior Writer, Activist Pvt. Asha Aparad dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.