तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:01 IST2025-12-11T18:01:22+5:302025-12-11T18:01:22+5:30
Anna Hazare News: तपोवनातील वृक्षतोडीला अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे.

तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
Anna Hazare News: २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आतापासूनच वेग आला आहे. साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन परिसरातील ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्याची योजना आहे. या कामासाठी १८०० झाडे तोडणे प्रस्तावित आहे. याला स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींचा जोरदार विरोध असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
तपोवनात साधुग्रामसाठी प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी एल्गार पुकारला आहे. कोणत्याही परिस्थितीत या परिसरातील एकही वृक्ष तोडू दिले जाणार नाही अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. अभिनेते सयाजी शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तपोवन वृक्षतोडीबाबत विरोध केला आहे. यानंतर आता अण्णा हजारे यांनीही या वृक्षतोडीविरोधात भूमिका स्पष्ट केली आहे.
वृक्ष तोडल्यामुळे खूप नुकसान होते
कुंभमेळा समाज आणि राष्ट्र हितासाठी असला तरी वृक्ष तोडणे कितपत योग्य आहे? वृक्ष तोडल्यामुळे खूप नुकसान होते. वृक्ष तोडल्यामुळे राष्ट्राचे नुकसान होतं, प्राण्यांचे नुकसान होते. मात्र, गरज असेल तर छोटी-छोटी झाडे तोडावी, पण मोठी झाडे तोडू नयेत, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नाशिकच्या तपोवन वाचवा मोहिमेसंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मोहीम व्यापक करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. राज यांनी तपोवन वाचवा मोहिमेला पाठिंबा देत पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य देण्याची तयारी दर्शवली. आम्ही सरकारचे शत्रू नाही, पण आमची भूमिका त्यांना समजली पाहिजे. तपोवनात झाडांच्या मुद्द्यावरून पाठिंबा देणाऱ्यांची भेट घेणार आहोत. उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. अजित पवारांनी पाठिंबा दिल्याचा आनंद आहे. वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांनी दिली.