या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 09:18 IST2025-09-25T09:17:06+5:302025-09-25T09:18:13+5:30
अल्पभूधारक तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर (३९) यांनी बुधवारी सकाळी झाडाला गळफास घेतला.

या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
केज (जि. बीड) : केज तालुक्यातील बोरगाव येथील ६२ वर्षीय शेतकरी रमेश ज्ञानोबा गव्हाणे यांनी मंगळवारी शेतातून गेलेल्या विजेच्या तारेला स्पर्श करून जीवन संपवले.
कारण : सोयाबीनचे पीक पूर्ण कुजले. नदीकाठची ८ एकर सुपीक जमीन वाहून गेली. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, याची चिंता.
परिवार : पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना व नातवंडे
भूम (जि. धाराशिव) : भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील एका शेतकऱ्याने शेतातील गोठ्यात गळफास घेऊन बुधवारी आत्महत्या केली. लक्ष्मण बाबासाहेब पवार (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कारण : १ हेक्टरवरील पिके वाहून गेले. दोन वासरेही मृत्युमुखी पडली. कर्ज काढून घेतलेल्या २ ट्रॅक्टरचे हप्ते व उपजीविकेचे संकट. परिवार : आई, पत्नी, तीन मुले
सोलापूर : सात लाखांचे कर्ज... गळफास घेऊन जीवन संपवले
बार्शी (जि. सोलापूर) : कारी येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर (३९) यांनी बुधवारी सकाळी झाडाला गळफास घेतला.
कारण : साडेतीन एकरातील पेरू, लिंबू व इतर पिके पाण्यात गेली. बँकेचे ७ लाखांचे कर्ज व हातउसने दोन लाख रुपये आता कसे फेडायचे, याची चिंता.
परिवार : पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, नऊ वर्षांची मुलगी.
सोलापूर : चिठ्ठीत लिहून गेला...मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या
वैराग (सोलापूर) : दहिटणे येथील शेतकरी लक्ष्मण गवसाने (४५) यांनी गळफास घेतला. ‘अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या करत आहे, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी’, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. कारण : दीड एकरवरील पिकाची हानी.
परिवार : पत्नी, तीन आपत्य, मुलगी विज्ञान शाखेत, मुलगा अभियांत्रिकी करतो.
पावसानं रडवलं...
पुरानं होतं नव्हतं ते नेलं...
डोळ्यांदेखत शेतीची माती झाली...
हाती उरली ती फक्त हताशा...
पण, तरीही खचू नकोस
ताठ आहे कणा अजून
हिंमत बिलकुल हारू नकोस
हिरवी स्वप्नं पुन्हा उगवतील
मोडलेले संसार पुन्हा बहरतील
फक्त गरज आहे ती
पाठीवरती हात ठेवून धीर देण्याची...
अस्मानीच्या या संकटात
बळीराजा तू एकटा नाहीस...
अख्खा महाराष्ट्र सोबत आहे !
- दुर्गेश साेनार