सचिवालय १ डिसेंबरला येणार
By Admin | Updated: November 14, 2014 00:52 IST2014-11-14T00:52:20+5:302014-11-14T00:52:20+5:30
देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ८ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार असून त्यासाठी १ डिसेंबरला

सचिवालय १ डिसेंबरला येणार
८ डिसेंबरपासून अधिवेशन : २८ नोव्हेंबरपर्यंत वाहने मागविली
नागपूर : देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ८ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार असून त्यासाठी १ डिसेंबरला सचिवालय नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहन व्यवस्थेची तयारी सुरू झाली आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारपुढे विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित करण्याचे आव्हान होते. मुंबईत झालेल्या विशेष अधिवेशनात सरकारने आवाजी मताने हा ठराव पारित करून पहिली खेळी जिंकली. आता खऱ्या अर्थाने दुसऱ्या खेळीला नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सुरुवात होणार आहे.
विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख (८ डिसेंबर २०१४) जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर अधिवेशनाच्या तयारीला वेग आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २८ नोव्हेंबरपासून सचिवालयातील कर्मचारी येण्यास सुरुवात होणार असून १ डिसेंबरपासून सचिवालयाचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार वाहन व्यवस्थेचे नियोजनही सुरू करण्यात आले आहे. नागपूरमध्ये येणारे मंत्री, राज्यमंत्री, सचिवपातळीवरील अधिकारी, महामंडळांचे अध्यक्ष आणि इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वाहन व्यवस्था करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त कार्यालयाची असते. त्यासाठी दरवर्षी राज्यातील (मुंबई, कोकण महसूल विभाग वगळून) शासकीय वाहनांचे अधिग्रहण केले जाते. (प्रतिनिधी)
दोन हजार वाहनांची मागणी
सरासरी दोन हजार वाहनांची मागणी नोंदविण्यात येते. प्रत्यक्षात १००० ते १२०० वाहने उपलब्ध होतात. त्यातून मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांचे वाटप केले जाते. त्यात सामान्यपणे कार, जीप्सचा समावेश अधिक असतो. सामानांच्या वाहतुकीसाठी व कर्मचाऱ्यांसाठी जीप, ट्रक, बसही मागविली जाते. यंदाही गतवर्षीप्रमाणेच वाहनांची मागणी विविध शासकीय कार्यालयांकडे करण्यात येणार असून त्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत वाहने नागपूरला पोहचतील अशा बेताने पाठवावीत असे पत्र पाठविण्यात आले आहे. अधिवेशन तीन आठवडे किवा एक महिना चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे.