अंबादास दानवेंच्या दाव्यानंतर 'फार्म हाऊस'ची शोधमोहिम गतीमान, अनेकांची धावपळ
By नरेश डोंगरे | Updated: December 20, 2024 20:30 IST2024-12-20T20:30:21+5:302024-12-20T20:30:43+5:30
Nagpur News: बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्या प्रकरणात फरार आरोपी वाल्मिक कराड नागपुरात लपून असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. त्यामुळे कराडचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांसोबत अनेकांनी आपापली यंत्रणा कामी लावली.

अंबादास दानवेंच्या दाव्यानंतर 'फार्म हाऊस'ची शोधमोहिम गतीमान, अनेकांची धावपळ
- नरेश डोंगरे
नागपूर : बिड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्या प्रकरणात फरार आरोपी वाल्मिक कराड नागपुरात लपून असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. त्यामुळे कराडचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांसोबत अनेकांनी आपापली यंत्रणा कामी लावली. परिणामी शुक्रवारी सायंकाळनंतर 'त्या फार्म हाऊस'ची शोधमोहिम नागपुरात अचानक वेगवान झाली होती.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सर्वत्र रोष निर्माण करणारे ठरले आहे. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने हे प्रकरण उचलून धरल्याने बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली आणि अन्य घडामोडीही झाल्या आहेत. तथापि, या प्रकरणातील कथित सूत्रधार वाल्मिक कराड फरार असून, त्याच्यासह अनेकांना अद्याप अटक न झाल्याने राज्यभरात हे प्रकरण असंतोष निर्माण केला आहे. कराडला एका मंत्र्याचा वरदहस्त असल्याचा आणि त्यामुळेच पोलीस त्याचा बचाव करीत असल्याचा आरोप होत आहे. अशात शुक्रवारी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराड नागपुरातच असल्याचे आणि तो कोणत्या फार्म हाऊसवर आहे, ते आपण सांगू शकत असल्याचे म्हणत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर एकीकडे तपास यंत्रणेने वाल्मिक कराडच्या शोधासाठी 'ते' फार्म हाऊस कोणते, त्याचा शोध घेण्यासाठी धावपळ चालविली. दुसरीकडे काही पत्रकारांनीही 'ते फार्म हाऊस' कुठे, असे फोनोफ्रेण्ड करीत विचारणा केली. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून अचानक त्या फार्म हाऊसला शोधण्याची मोहिम तीव्र झाली.
काहींची हिंगण्याकडे, काहींची वर्धा मार्गावर शोधाशोध
मंत्र्याचा वरदहस्त, वाल्मिक कराड आणि फार्म हाऊसची सांगड घालत काही जणांनी तर्क वितर्क लावले. त्यानंतर काहींनी हिंगण्यातील एका फार्म हाऊसकडे तर काहींनी वर्धा मार्गावरील खापरी नजिकच्या फार्म हाऊसकडे धाव घेतली. दरम्यान, प्रस्तूत प्रतिनिधीने या संबंधाने दानवे यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाही.