मुंबई : वडाळा परिसरातून ओला टॅक्सीसह पसार झालेल्या चौकडीला मुंबईच्या मालमत्ता कक्षासह नंदुरबार पोलिसांनी अटक केली. प्रवासादरम्यान त्यांनी २ गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अहमद कादर शेख (२२), अक्रम इक्बाल खान (२६), जाहिर खान (२७), वकार हुसेन खान (२४) अशी आरोपींची नावे आहेत. चौघेही मुंब्रा येथील राहिवासी आहेत.भायखळा येथील रहिवासी असलेले प्रवीण होनप यांनी नुकतीच स्विफ्ट डिझायर ओला कंपनीसाठी लावली होती. २४ जुलैला त्यांना ओलातून भायखळा पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी कॉल आला होता. त्यानुसार त्यांनी चार प्रवाशांना पश्चिमेच्या दिशेने नेले. आरोपींनी त्यांना वडाळा फ्री- वेच्या दिशेने गाडी नेण्यास सांगितली. तेथून पुढे एका निर्जन स्थळी गाडी थांबवून होनपवर वार केले. होनपने तेथून पळ काढला. या चौकडीने ओला कारसह तेथून पळ काढला. वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेचा मालमत्ता कक्षही समांतर तपास करत होता. असेच गुन्हे ठाण्यातील राबोडी, भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यातदेखील दाखल झाल्याचे समोर आले. मालमत्ता कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक दीप बने यांना त्यांच्या गुप्त माहितीदारांकडून गुन्ह्यांतील आरोपी मुंब्रा येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बने यांच्या पथकाने अधिक तपास सुरू केला. मास्टरमार्इंड अहमदच्या मुसक्या आवळल्या. अहमद अभिलेखावरील आरोपी असून, २१ जुलै रोजी तो जामिनावर बाहेर आला होता. त्याच्या चौकशीत हा ‘प्रताप’ समोर आला. ओला कार घेऊन ते मध्य प्रदेशात गेले. दरम्यान, कार मध्येच बंद पडली, शिवाय पैसेही संपल्याने त्यांनी कार तेथेच सोडून मारुती आल्टोची जबरी चोरी केली. या प्रकरणी ३ आॅगस्ट रोजी मानपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेथून नाशिकला जात असताना त्यांचा नंदुरबार परिसरात अपघात झाला. या अपघाताप्रकरणी नागरिकांनी त्यांना नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात दिले. नंदुरबार पोलिसांनी त्यांना अपघातप्रकरणी अटक केली. अहमदने पळ काढत मुंब्रा गाठले. मात्र बने यांच्या पथकाने त्याला अटक केली. (प्रतिनिधी)>ओला टॅक्सी टार्गेटवरमुंब्रा येथील टोळीने ओलाच्या चालकांना टार्गेट केले होते. चोरीतील मोबाइल वापरून ते ओला टॅक्सी बुक करत होते. त्यानंतर चालकाला निर्जन स्थळी नेऊन त्याची लूट करत गाडीसह पसार व्हायचे. अशा प्रकारे फसवणुकीचे त्याच्याविरोधात राबोडी, नारपोली आणि वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.
टॅक्सीसह पळालेली चौकडी गजाआड
By admin | Updated: August 5, 2016 01:54 IST