स्कील्ड महाराष्ट्र हवा की स्कॅम महाराष्ट्र?
By Admin | Updated: October 8, 2014 03:22 IST2014-10-08T03:22:59+5:302014-10-08T03:22:59+5:30
१५ वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेले घोटाळे आणखी किती दिवस सहन करणार?

स्कील्ड महाराष्ट्र हवा की स्कॅम महाराष्ट्र?
धुळे/जळगाव/नागपूर : १५ वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेले घोटाळे आणखी किती दिवस सहन करणार? तुम्हाला ‘स्कील्ड’ महाराष्ट्र हवा की ‘स्कॅम’ महाराष्ट्र हवा, असा सवाल करीत काँग्रेसने घोटाळे दिले, भाजपाचे सरकार आले, तर कुशल महाराष्ट्र (स्कील्ड महाराष्ट्र) घडवू, असा विकासाचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नागपुरात दिला.
धुळे, जळगाव आणि नागपूर जिल्ह्यात मंगळवारी मोदी यांच्या जाहीर सभा झाल्या़ मोदी म्हणाले, राज्यात १५ वर्षांपासून आघाडी सरकारकडून लूट सुरू आहे. या काळात दोन पिढ्यांचे भवितव्य संकटात गेले. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे विशेषत: मुंबईचे मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्र संकटात असेल तर त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होतो. ही निवडणूक राज्याचे भवितव्य ठरविणारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आतापर्यंत घोटाळ्याचे (स्कॅम) सरकार दिले, आम्हाला सत्ता दिली तर आम्ही ‘स्कील्ड’ सरकार देऊ, असे आश्वासन मोदी यांनी दिले़ केंद्रात भाजपाची सत्ता आल्यावर स्कील्ड डेव्हलपमेन्टसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले. नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात यासंदर्भाच एक सामंजस्य करारही करण्यात आला. त्यानुसार भारताने एक हजार तज्ज्ञांची मागणी अमेरिकेला केली आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. त्यातून एका कुशल महाराष्ट्राची जडणघडण होईल, असे सांगून मोदी म्हणाले, मध्यमवर्गीय माणूस त्रस्त आहे. कोट्यवधी लोकांकडे स्वत:चे घर नाही. ते मिळायला नको का? २०२२मध्ये देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होतील. तोपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकांना स्वत:चे घर मिळेल.
जळगाव जिल्ह्यात झालेल्या जाहीत सभेत काही दिवसांपासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महाराष्ट्रापासून अजिबात वेगळी करण्यात येणार नाही़ जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मोदींनी केले. (प्रतिनिधी)