विज्ञानाधारित साहित्याला आता चालना मिळेल; साहित्य संमेलनाचे ‘आकाशाशी जडले नाते’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:06 AM2021-01-25T06:06:37+5:302021-01-25T06:06:54+5:30

 डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी  झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते,

Science-based literature will now get a boost; Sahitya Sammelan's 'Relationship with the Sky' | विज्ञानाधारित साहित्याला आता चालना मिळेल; साहित्य संमेलनाचे ‘आकाशाशी जडले नाते’

विज्ञानाधारित साहित्याला आता चालना मिळेल; साहित्य संमेलनाचे ‘आकाशाशी जडले नाते’

googlenewsNext

पुणे : गेल्या चार दशकांहून अधिक काळ खगोलभौतिकी क्षेत्रातील अद्वितीय अशा कार्यकर्तृत्वातून डॉ. जयंत नारळीकर यांनी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत  ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. खगोल क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांना  ‘पद्मभूषण’ , पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण’ हे सन्मानही मिळाले. परंतु, केवळ संशोधन क्षेत्रात कार्यरत न राहता त्यांनी लेखनाच्या माध्यमातून विज्ञानवादाचा प्रसार केला. 

अंतराळातील भस्मासूर, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप ही त्यांची काही गाजलेली  विज्ञानवादी पुस्तके. ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार, ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार आणि फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार आदी पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. 

 डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी  झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते, तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या.  शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळविली. याशिवाय  रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड म्हणजे संमेलनाच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. डॉ. नारळीकरांनी विज्ञान आणि साहित्याची उत्तम सांगड घातली आहे. ते प्रज्ञावंतही आहेत आणि प्रतिभावंतही. त्यांची निवड सर्वार्थाने योग्य आहे. त्यांच्या निवडीने विज्ञानाधारित साहित्याला चालना मिळेल, अशी भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली. 

‘डॉ. नारळीकर हे महायोगी आणि ॠषीतुल्य आहेत. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. मराठी साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. विज्ञानकथा हा साहित्यप्रकार त्यांनी लोकप्रिय केला. त्यांची निवड ही संमेलनाचा सन्मान आहे.’ - फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अध्यक्ष, उस्मानाबाद येथील साहित्य संमेलन

जयंतरावांचे आणि माझे घरोब्याचे संबंध आहेत. ते थोर शास्त्रज्ञ आहेतच; त्यांनी सहजसोप्या भाषेत वैैज्ञानिक लिखाण केले आहे. संमेलनाध्यक्षपद हा खूप मोठा सन्मान आहे. त्यांची निवड यापूर्वीच व्हायला हवी होती. त्यांनी लिखाणातून जनजागृतीही केलेली आहे. मनोरंजन आणि ज्ञानाची उत्तम सांगड त्यांनी घातली आहे. - डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

संमेलनाध्यक्षपदी वैज्ञानिकाची निवड हा खूप चांगला संकेत आहे. भाषा हे एक मोठे विज्ञान आहे. विज्ञान हा भाषेचा अविभाज्य भाग आहे. त्यादृष्टीने एका वैैज्ञानिकाची निवड अत्यंत योग्य आहे. विज्ञान मातृभाषेमध्ये येणार नाही, तोवर त्याचा उपयोग सर्वसामान्यांना होणार नाही. विज्ञान सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम नारळीकरांनी केले आहे.- डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ 

‘डॉ. नारळीकरांपूर्वीही मराठीत विज्ञान लेखन होत होते. पण तो प्रवाह काहीसा क्षीण होता. ते लिहिते झाले, त्यावेळी त्यांच्या नावामागे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैैज्ञानिकाचे मोठे वलय होते. त्यांनी विज्ञान कथा, कादंबरीचे लेखन एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्यामुळे अनेक नवे लेखक विज्ञान विषयाकडे वळले.’     - दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन 

डॉ. नारळीकर यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले जाणे ही मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक महत्त्वाची अशी घटना आहे. डॉ. नारळीकर  मराठी विज्ञान कथेचे प्रवर्तन करणारे  लेखक असून मराठी भाषा व  साहित्य क्षेत्रात हा नवा प्रकार त्यांच्या लेखनाने प्रतिष्ठित झाला. - श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ   

विज्ञानाने जगाला नवी दिशा दाखवली, नवा पायंडा पाडला. यामध्ये अग्रणी असलेले नाव म्हणजे डॉ. जयंत नारळीकर. त्यांनी मराठीपासून अलिप्त न राहता आपल्या ज्ञानाच्या आधारे लिखाण करत भाषेला समृद्ध केले. त्यांचा सन्मान अत्यंत योग्य आहे. - डॉ. सदानंद मोरे,  माजी संमेलनाध्यक्ष

विज्ञानाच्या नवीन संकल्पना कथांमधून मांडत त्यांनी विज्ञान सहजसोपे केले. त्यांच्या निमित्ताने अनेक तरुण लेखक साहित्याकडे वळतील. महामंडळाने विज्ञान कथा लेखनाबाबत नारळीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घ्याव्यात.  - लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष

सरांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने विज्ञानाधारित साहित्याला चालना मिळेल. कलेमध्ये कायम विज्ञानाचा अभाव जाणवतो. ती पोकळी यानिमित्ताने भरून निघेल.  - राजेंद्रकुमार सराफ, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद

 

Web Title: Science-based literature will now get a boost; Sahitya Sammelan's 'Relationship with the Sky'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.