अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 17:13 IST2025-11-09T17:12:21+5:302025-11-09T17:13:01+5:30
School Bus Accident: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ शालेय बसला भीषण अपघात. बस १०० फूट दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर १५ गंभीर जखमी. मेहुनबारी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर. वाचा सविस्तर वृत्त.

अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
अक्कलकुवा, नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ आज (रविवार) दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील अमलीबारी येथील एका धोकादायक वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम शाळेचे हे विद्यार्थी होते. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेऊन जाण्यासाठी ही बस आली होती. बसमध्ये विद्यार्थी भरलेले असताना दुपारी मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावर हा अपघात झाला. तीव्र उतारावरील वळणावर चालकाचा तोल सुटल्याने बस खोल दरीत उलटली. काही विद्यार्थी बसखाली दबले गेल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला.
जखमींवर उपचार
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सातपुडा पर्वतरांगेतील या रस्त्यावर छोटे अपघात वारंवार घडत असले तरी, गेल्या दोन महिन्यांतील हा दुसरा मोठा अपघात असल्याने या रस्त्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.