दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:26 IST2025-11-01T15:23:43+5:302025-11-01T15:26:28+5:30
१ वर्ष निवडणुका लांबल्या तर फरक काय पडतो, मतदार याद्या पारदर्शक केल्या पाहिजेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केले.

दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात अनेक दुबार मतदार याद्यांमध्ये समाविष्ट आहे. निवडणूक आयोगाच्या कटकारस्थानाने मॅच फिक्सिंग केली जाते. उन्हात उभ्या राहणाऱ्या मतदारांचा अपमान केला जातो. उद्या निवडणूक होईल तेव्हा जर दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढा असा घणाघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. विरोधी पक्षांच्या सत्याचा मोर्चा यात ते बोलत होते. या मोर्चात राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या याद्यांचा गठ्ठा जनतेसमोर दाखवला.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजण्याचा आणि समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. मोठ्या ताकदीने आज तुम्ही मोर्चाला जमला त्याबद्दल आभार आहोत. मतदार यादीत दुबार मतदार आहेत. सर्व पक्षाचे लोक यादीत दुबार मतदार असल्याचे बोलतायेत मग निवडणूक घेण्याची घाई का? मतदार याद्या पारदर्शक केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीतील साडे चार हजार मतदारांनी मलबार हिल मतदारसंघातही मतदान केले आहे. प्रभाकर तुकाराम पाटील, राम भोईर, पुंडलिक भोईर या लोकांनी त्यांच्या मतदारसंघातही मतदान केले, मलबार हिलमध्येही मतदान केले. अशाप्रकारे लाखो मतदार आहेत असा आरोप त्यांनी केला.
तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १७ लाख २९ हजार मतदारांपैकी ६२३७० मतदार दुबार आहेत. दक्षिण मुंबईत १५ लाख १५ हजार ९९३ मतदारांपैकी ५५ हजार मतदार दुबार आहेत. मावळमध्ये १ लाख ४५ हजार ६३६ दुबार मतदार, पुणे १ लाख २ हजार दुबार मतदार, ठाणे २ लाख ९ हजार दुबार मतदार आहेत. या सर्वांचे आकडे सांगतानाच संपूर्ण मतदारांचा डेटा राज ठाकरेंनी दाखवले. एवढे मतदार दुबार असताना जानेवारी महिन्यात निवडणूक कशाला घेता? १ वर्ष निवडणुका लांबल्या तर फरक काय पडतो, मतदार याद्या पारदर्शक केल्या पाहिजेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केले.
दरम्यान, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मतदार याद्यातून समोर येत आहेत. मी २०१७ पासून ईव्हीएम मशिनबाबत सांगतोय. २३२ आमदार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात सन्नाटा असेल, मतदार गोंधळलेले होते. ही सगळी कारस्थाने निवडणूक आयोगाच्या कटकारस्थानातून केली जातायेत. मॅच आधीच फिक्स आहे. मतदारांचा अपमान केला जातो. तुम्ही घराघरात जा. सर्वांचे चेहरे मतदार यादीनुसार पाहा. जेव्हा कधीही निवडणूक होईल जर दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हाती द्यायचे. त्याशिवाय हा महाराष्ट्राचा कारभार वठणीवर येणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी केला आहे.