जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच विकास शिंदे यांच्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आणि वाई पंचायत समितीचे सभापती भैय्या डोंगरे यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सातारा पोलिसांनी तातडीची कारवाई करत देसाई आणि मांडवे यांना साताऱ्यातून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट परिणाम होऊन भाजपने बाजी मारली, तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना युतीला धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शुक्रवारी एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले होते. या कारवाईमुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून निवडणुकीला आता 'पोलिसी' वळण लागल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना साताऱ्यातून ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हे दोघेही सकाळी मतदानासाठी साताऱ्यात पोहोचलेले होते.
पोलिसांवर गंभीर आरोप: "मतदानापासून रोखण्यासाठी दडपशाही"ताब्यात घेतल्यानंतर अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तात्काळ सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून या सदस्यांनी पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. "आम्हाला जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी ही दडपशाही केली आहे. पोलिसांनी आम्हाला बेदम मारहाण केली असून ही लोकशाहीची हत्या आहे," असा आरोप या सदस्यांनी केला आहे. मतदानाच्या दिवशीच सदस्यांना उचलणे हा सत्तेचा गैरवापर असल्याची टीका राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेकडून केली जात आहे.
सभागृहाबाहेरून आम्हाला पोलिसांनी उचलून नेले. मारहाण केली. आमच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी आणि पालकमंत्री वर जात होतो. त्यांचे रक्त माझ्या शर्टाला लागले आहे. राष्ट्रवादीचे २२ सदस्य आणि सेनेचे १५ असे ३७ होते. आमचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य फोडले. तरीही ३३ सदस्य होते. बापुसाहेब शिंदे आमच्यासोबत रोज आहेत, त्याचे अपहरण केल्याची तक्रार आमच्याविरोधात करण्यात आली. पालकमंत्र्यांना देखील ओढत नेले. यशवंतरावांच्या जिल्ह्यात लोकशाहीची हत्या भाजपने केली आहे. बापुसाहेब शिंदे यांनी वाई पोलिस अधिकाऱ्यांसमोर येऊन माझे अपहरण झालेले नाही असे सांगितले, असा गंभीर आरोप या दोन सदस्यांनी केला आहे.
दरम्यान, दि. १९ रोजी महाबळेश्वर हे निवडणुकीचे 'पॉवर सेंटर' बनले होते. संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेने आपल्या सदस्यांना तब्बल ४० दिवस वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी सर्व सदस्यांना महाबळेश्वर येथे आणण्यात आले. मात्र, रात्री उशिरा अचानक पोलिसांचा ताफा हॉटेल 'रेड बटन' येथे दाखल झाला आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. पोलिसांना हवी असलेली व्यक्ती सापडली नाही.
Web Summary : Satara Zilla Parishad elections saw dramatic police action. NCP members Anil Desai and Sandeep Mandve were detained amid kidnapping allegations, hindering their voting. They allege police brutality and political pressure. BJP won, leading to accusations of power misuse and democratic failure.
Web Summary : सतारा जिला परिषद चुनाव में नाटकीय पुलिस कार्रवाई हुई। अपहरण के आरोपों के बीच राकांपा सदस्य अनिल देसाई और संदीप मांडवे को हिरासत में लिया गया, जिससे मतदान बाधित हुआ। उन्होंने पुलिस क्रूरता और राजनीतिक दबाव का आरोप लगाया। भाजपा की जीत पर सत्ता के दुरुपयोग के आरोप लगे।