...अन् मायलेक अक्षरशः धाय मोकलून रडले; जणू अपघात होणार आधीच कळलं, आईनं मुलाला आग्रहानं हेल्मेट दिलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:23 IST2025-03-05T13:22:59+5:302025-03-05T13:23:34+5:30
तू हेल्मेट डोक्यात घाल आणि जा. पोहोचल्यानंतर फोन कर.." असं सांगत डबडबत्या डोळ्यांनी आईनं मुलाला निरोप दिला.

...अन् मायलेक अक्षरशः धाय मोकलून रडले; जणू अपघात होणार आधीच कळलं, आईनं मुलाला आग्रहानं हेल्मेट दिलं
दत्ता यादव
सातारा - हेल्मेट न घेता मुलगा घरातून बाहेर गेला. मुलानं हेल्मेट घालावं, असं आईला मनोमन वाटत होतं. शेवटी आग्रह धरून आईनं मुलाला हेल्मेट दिलंच. जणू काही अपघात होणार याची आईला आधीच हुरहुर लागली अन् तसंच झालं. हेल्मेटमुळे मुलाचा जीव वाचला पण, हेल्मेट न घालणारा त्याचा मित्र कोमात गेला. मन हेलावून टाकणारी ही घटना साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरातील आहे.
सूरज जाधव (वय २४) आणि पिंटू ऊर्फ राजेश शिंदे (वय २४, दोघेही रा. मोळाचा ओढा, परिसर सातारा) हे दोघे मित्र. सूरजला मुलाखतीसाठी पुण्यातून कॉल आल्याने दोघे मित्र दुचाकीवरून पुण्याला निघाले. घरातून निघताना हेल्मेट ने, असं आईनं सूरजला सांगितले. पण, त्यानं दुर्लक्ष केलं. तो तसाच निघून गेला. आईला घरात हेल्मेट दिसल्यानंतर एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात हेल्मेट घेऊन आई चौथ्या मजल्यावरून मुलाशी फोनवर बोलत पायऱ्या उतरत खाली आली.
तू कुठे आहेस. थांब, हेल्मेट घेऊन जा. तू जर हेल्मेट नेले नाहीस तर तू जिथंपर्यंत गेलास तिथपर्यंत मी हे हेल्मेट घेऊन चालत येतेय, हे ऐकताच तीन-चार किलोमीटर पुढे गेलेला सूरज आईच्या आग्रहामुळे परत आला. "अगं आई, मी नेहमीच गाडीवरून जातो. कशाला टेन्शन घेतेस?" असं तो म्हणाला. मात्र "काही सांगू नकोस. तू हेल्मेट डोक्यात घाल आणि जा. पोहोचल्यानंतर फोन कर.." असं सांगत डबडबत्या डोळ्यांनी आईनं मुलाला निरोप दिला.
एकीकडे आनंदाश्रू...
दीड तासात आईचा फोन खणखणला..."तुमच्या मुलाचा अपघात झालाय. दोघांनाही पुण्याला हलवलंय." ते ऐकून आईच्या पायाखालची जमीन हादरली. शेजान्यांना सोबत घेऊन ती बसने पुण्याला निघाली. बसमध्ये बसतानाच पुन्हा फोन खणखणला. "आई, मी सूरज बोलतोय. आमचा अपघात झालाय. मी ठीक आहे. पण, पिंटूला खूप लागलंय. त्याला पुण्याला अॅडमिट करतोय. आई तू हेल्मेट दिल्यामुळे मला काहीही झालं नाही.." त्यानं असं सांगताच आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
मायलेक अक्षरशः धाय मोकलून रडले...
पुण्यातीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मुलाला सुखरूप पाहताच आईने कडकडून मिठी मारली. मायलेक अक्षरशः धाय मोकलून रडले. हेल्मेटचं महत्त्व काय आहे हे सूरजला समजलं. पण, मित्र कोमात गेल्यामुळे सारेच चिंतित आहेत. सूरजने हेल्मेट घातलं होतं. पण, पिंटू विनाहेल्मेटचा होता.