राजेंचा शब्द अन् सातारकरांचा विक्रमी कौल! आमदाराला लाजवेल इतक्या मोठ्या फरकारने अमोल मोहिते विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:45 IST2025-12-21T16:34:38+5:302025-12-21T16:45:54+5:30
सातारा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते विजयी झाले आहेत.

राजेंचा शब्द अन् सातारकरांचा विक्रमी कौल! आमदाराला लाजवेल इतक्या मोठ्या फरकारने अमोल मोहिते विजयी
Satara Nagar Parishad Election Result 2025: सातारा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल ४१,०४० मतांच्या अवाढव्य फरकाने विजय मिळवत सातारा शहरावर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एखाद्या आमदारालाही लाजवेल इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे राजकीय वर्तुळात अमोल मोहिते यांच्या विजयाची मोठी चर्चा होत आहे.
सातारा नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अमोल मोहिते यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. त्यांना एकूण ५७,५९६ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुरस्कृत उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांना केवळ १५,५५६ मतांवर समाधान मानावे लागले. ४१ हजार पेक्षा जास्त मतांचे हे अंतर साताऱ्याच्या नगरपालिकेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरले आहे.
सातारा जिल्ह्यात भाजपला साथ
केवळ सातारा शहरच नव्हे, तर जिल्ह्यातही भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. फलटण येथे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सत्तेला मोठा धक्का बसला असून त्यांचे चिरंजीव अनिकेतराजे यांचा पराभव झाला आहे. भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर येथे विजयी झाले आहेत. वाईमध्ये भाजपचे अनिल सावंत नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. रहिमतपूर येथे भाजपच्या वैशाली निलेश माने यांचा विजय झाला. मलकापूरमध्ये भाजपचे तेजस सोनवले यांनी बाजी मारली. मेढा नगरपंचायतीत भाजपच्या रूपाली वरखडे विजयी झाल्या आहेत.
पाचगणीत 'काटे की टक्कर', महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीचा गुलाल
पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादी (अजित पवार गट) पुरस्कृत उमेदवार दिलीप बगाडे यांनी अवघ्या २ मतांनी निसटता विजय मिळवला. मात्र, या निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी झाल्याने अधिकृत निकाल सध्या राखून ठेवण्यात आला आहे. महाबळेश्वर मध्ये मात्र अजित पवार गटाचे सुनील शिंदे यांनी १४५१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.