‘सारथी’च्या तब्बल २,७०० केंद्रांना दमडीही नाही; संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प, राज्यभरातील तरुणांची कोंडी
By पोपट केशव पवार | Updated: October 29, 2025 15:45 IST2025-10-29T15:44:21+5:302025-10-29T15:45:07+5:30
निधीच नसल्याने प्रशिक्षक केंद्रांनी प्रशिक्षण देणे बंद केले

‘सारथी’च्या तब्बल २,७०० केंद्रांना दमडीही नाही; संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प, राज्यभरातील तरुणांची कोंडी
पोपट पवार
कोल्हापूर : मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजातील नॉन-क्रिमीलेअर गटातील तरुण - तरुणींना संगणक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी सारथी संस्थेने छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आखला खरा. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरातील २,७०० प्रशिक्षण केंद्रांना एक रुपयाचीही दमडी न दिल्याने राज्यभरात हा प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प झाला आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यभरातील हजारो तरुण उत्सुक आहेत. मात्र, निधीच नसल्याने प्रशिक्षक केंद्रांनी प्रशिक्षण देणे बंद केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. यामध्ये संगणक कौशल्ये, संवाद कौशल्ये आणि इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांना विविध संगणक संबंधित शाखांमध्ये नोकरीच्या संधी आहेत.
यातून प्रशिक्षण घेऊन अनेक तरुणांनी डेटा एंट्री, डेटा मॅनेजमेंटसह विविध क्षेत्रांत रोजगार मिळवला आहे. सहा महिन्यांचा हा प्रशिक्षण कोर्स असून, एका विद्यार्थ्यामागे सरकारकडून २० ते २५ हजार रुपये संबंधित प्रशिक्षण केंद्राला दिले जातात. राज्यभरात अशी २,७०० केंद्रे आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हा निधीच प्रशिक्षण केंद्रांना दिला नसल्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम बंद पडला आहे.
विद्यार्थ्यांचे कोर्स अपुरेच
सरकारने या प्रशिक्षण कार्यक्रमाचा निधी अचानक थकवल्याने अनेक विद्यार्थ्यांचे कोर्स अर्धवटच राहिले आहेत.
सारथीच्या या योजनेमुळे अनेकांना लाभ मिळत होता. मात्र, सध्या निधी नसल्याने हा कार्यक्रम बंद करणे हा गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. सरकारने एका चांगल्या संस्थेला अशा प्रकारे ‘खो’ घालू नये. लवकरात लवकर निधी द्यावा. - वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ