Who is Sambhaji Waybhase: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात सीआयडीला यश आले. देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड शरण आल्यानंतर तपासाला वेग आला आहे. यात हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचा संशय असलेल्या डॉ. संभाजी वायभसेला आणि त्याच्या पत्नालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत या आरोपींना अटक
हत्या झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पकडण्यास सुरूवात केली. आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आधी जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले आणि विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार झाले होते. घटनेनंतर ते तिघेही फरार झाले. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली.
आरोपींना पळून जाण्यात मदत करणारा डॉ. संभाजी वायभसे कोण?
संभाजी वायभसे हा डॉक्टर असून, त्याचा बीड जिल्ह्यातील केज स्वतःचा दवाखाना होता. संभाजी वायभसेने नंतर डॉक्टरकीचा पेशा सोडला. कारण वायभसेने नंतर ऊस मुकादम म्हणून काम करायला सुरूवात केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघेही ऊस मुकादम म्हणूनच काम करत होते. तिघेही एकच काम करत असल्याने त्यांच्यात मैत्री झाली होती.
संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यादिवसापासून वायभसेही फरार झाला होता. पोलीस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
अखेर संभाजी वायभसे हा सीआयडीला नांदेड शहरात सापडला. चौकशीत त्याने घुले आणि सांगळेचा पत्ता सांगितला. संभाजी वायभसेची पत्नी ही वकील आहे. त्याच्या पत्नीने सरकारी वकील म्हणून काम केलं आहे. दोघांनाही एकाच वेळी ताब्यात घेण्यात आले.
या दोघांनी आरोपींना आधी परराज्यात पळून जाण्यात मदत केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस यंत्रणा नजर ठेवून होती. त्यांची शुक्रवारी चौकशी केल्यानंतर शनिवारी सुदर्शन घुले आणि सुधीर आंधळेला अटक करण्यात यश आले.