गेल्या दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे आणि त्यांना अडचणीत आणणारे सत्तापक्षाचेच आमदार सुरेश धस यांच्यात समेट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या दोघांची गुप्तपणे भेट घडवून आणण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही भेट खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे. याचा आका हे मुंडे असल्याचे आरोप धस यांनी केले होते. तसेच मुंडे यांच्या विरोधात सातत्याने धस यांनी आवाज उठविला होता. बीडमधील दहशतवाद मोडून काढण्याची भाषा धस यांनी केली होती. मुंडेंचा राजीनामाही त्यांनी मागितला होता. अशातच मुख्यमंत्री फडवीस यांचीही त्यांनी भेट घेतली होती. यानंतरही धस यांनी मुंडेंवर आरोप करणे सुरुच ठेवले होते. परंतू, आता या भेटीमुळे धस आणि मुंडे यांच्यातील वैर संपल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मुंडे आणि धस यांची भेट एखा खासगी रुग्णालयात घडवून आणण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. महत्वाचे म्हणजे बावनकुळे यांनीही ही भेट मान्य केली आहे, परंतू मुंडेंच्या कार्यालयाने अशी भेट झाली नाही, असे सांगत वृत्त फेटाळले आहे.
बावनकुळे यांनी यावर बोलताना सांगितले की, आम्ही चार तास एकत्र होतो. सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे दोघेही होते. त्यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत. ते दूर होतील. आयुष्यात एक काळ असतो तो मतभेद दूर करतो. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, दोघेही मला भेटले. या दोघांत पारिवारिक भेट झाली आहे. परिवार म्हणून आम्ही एकत्र बसलो होतो, असे त्यांनी कबुल केले आहे.
धस-मुंडे भेटीवर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया आली आहे. मला देखील चार-पाच दिवसांपूर्वी समजलेले. बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याचे मला सांगितले गेले होते. अशी भेट झाली तर ती खूप दुर्दैवी आहे. धस आता मुंडेंविरोधात लढतील की नाही, काही खरे नाही. मला फार विचित्र वाटत आहे. ते आकाचा आका आहे असे बोलत होते. परंतू जे समोर येत आहे ते फार कठीण आहे, चुकीचे आहे, असे दमानिया म्हणाल्या आहेत.