संतोष देशमुख हत्या: सूत्रधाराला योग्य धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही -शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 18:07 IST2024-12-21T18:04:35+5:302024-12-21T18:07:41+5:30

शरद पवार यांनी हत्या करण्यात आलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सात्वंन करत उपस्थितांशी शरद पवारांनी संवाद साधला. 

Santosh Deshmukh murder case: Will not sit still until the mastermind is properly punished says Sharad Pawar | संतोष देशमुख हत्या: सूत्रधाराला योग्य धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही -शरद पवार

संतोष देशमुख हत्या: सूत्रधाराला योग्य धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही -शरद पवार

Sharad Pawar News: "मी एवढेच तुम्हाला सांगेन की, एक दहशतीचं वातावरण आहे. कृपा करा आणि त्या दहशतीतून बाहेर पडा. याला आपण सगळे मिळून तोंड देऊ. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यानंतर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही", असे शरद पवार मस्साजोग येथे बोलताना म्हणाले. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांचे शरद पवारांनी घरी जाऊन सात्वंनवर भेट घेतली. त्याचबरोबर उपस्थितांशी संवाद साधला. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर शरद पवार काय बोलले?

शरद पवार म्हणाले, "या हत्येने सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसलाय. बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात एक लौकिक आहे. मी अनेक वर्षापासून या ना त्या निमित्ताने या जिल्ह्याची संबंधित आहे. वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. त्या वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपले आयुष्य जगणारे, दुष्काळ काळात त्याला तोंड देणारे, महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे आणि त्याप्रती कष्ट करणारे कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर बीडचा उल्लेख हा केला जातो. अशा जिल्ह्यात जे काही घडलं हे कोणालाही न पटणारं, न शोभणारं अतिशय चमत्कारीक कशा प्रकारचं आहे."

"ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली. पंधरा वर्ष लोकांच्या पाठिंब्याने त्या पदावर बसण्याचं काम त्यांनी केलं. पंधरा वर्ष ज्याअर्थी निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाची समरस होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण, कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावांमध्ये काम करतोय. जे काही घडलं त्याच्यात त्यांचा काही संबंध नसताना, कोणी येऊन कोणाला दमदाटी केली. कोणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतोय म्हणून कुणी बाहेरून येतं, व्यक्तिगत हल्ला केला जातो आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल", असे शरद पवार म्हणाले. 

महाराष्ट्राच्या खासदारांनी लोकसभेत प्रश्न उचलून धरला -शरद पवार 

"लोकसभेचं अधिवेशन काल संपलं. तुमचे प्रतिनिधी बजरंग सोनवणे, निलेश लंके असतील आणि जे कोणी खासदार तिथे महाराष्ट्राचे आहेत, त्यांनी हा प्रश्न उचलून धरला. गृहमंत्र्यांना भेटले. संसदेमध्ये हा प्रश्न मांडून इथे न्याय द्या या प्रकारचा आग्रह बजरंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला. त्यांचे भाषण ऐकत होतो. मी काही त्यांच्या सभागृहाचा सदस्य नाहीये पण ऐकत होतो. सबंध सभागृह, ते जे काही सांगत होते ते ऐकल्यानंतर स्थगित झालं. या देशातील राज्यात काय चाललंय? अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले", असेही पवार म्हणाले. 

"हे दुखणं जिथं मांडायला हवंय तिथं मांडलं. त्यांनी एकच गोष्ट सतत सांगितली की सूत्रधार याच्या खोलात गेलं पाहिजे. आणि यांचे सुसंवाद कोणाकोणाशी झाले. फक्त टेलिफोन वर असेल किंवा इतर कशावर. या सगळ्यांची जी माहिती आहे ही काढली पाहिजे. त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तूस्थिती सगळ्यांच्या समोर येईल हा आग्रह बजरंग सोनवणे आणि बाकीच्या सगळ्या सहकार्य देशाच्या पार्लमेंटमध्ये केला", असे शरद पवार उपस्थितांशी बोलताना म्हणाले.

यावेळी शरद पवार म्हणाले, "जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला. त्यांनी हा कधी विचार केला नाही की ती कोणत्या समाजाचे आहेत. अन्याय होतोय, अन्याय झालाय अन त्या अन्याय झाल्याला जे कोणी जबाबदार असेल त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला." 

शरद पवार म्हणाले, "धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही"
 
"मी स्वतः थोडीबहुत माहिती घेतली. त्याच्यामध्ये सोळंके आणि इतर काही लोक बोलले. एक या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी, शेजारच्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला. मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने दिलीत. त्यांनी काही रक्कम दिली. ठीक आहे.. कुटुंबाला त्याची मदत होईल. पण तुम्ही कितीही मदत दिली तरी गेलेला माणूस येत नाही. त्या कुटुंबाचा हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही. पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. त्याच्यावर टिप्पणी करू इच्छित नाही. पण एक गोष्ट करावी लागेल की जोपर्यंत त्याच्या खोलात जाऊन जे कोणी जबाबदार आहेत आणि जे कोणी सूत्रधार म्हणून याचा मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही", अशी भूमिका शरद पवारांनी ग्रामस्थांसमोर मांडली.  

"मी एवढेच तुम्हाला सांगेन की, एक दहशतीचं वातावरण आहे. कृपा करा आणि त्या दहशतीतून बाहेर पडा. याला आपण सगळे मिळून तोंड देऊ. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यानंतर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, कालच आम्ही पार्लमेंट संपवून आज इथे आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हा कोणालाच न शोभणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत, त्यांच्या दुःखामध्ये ते एकटे नाहीत. आपण सगळे आहोत हे आपण केलं पाहिजे. आणि इथली स्थिती दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे", असे आवाहन शरद पवारांनी केले. 

पवारांनी घेतली मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

"कुटुंबात लहान मुलं आहेत. त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्याकडे बारामतीला फार मोठी मुलींची शैक्षणिक सुविधा आहे. जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात. त्याच्यामध्ये आणखीन एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू. त्यांना धीर देऊ. कुटुंबाला धीर देऊ. त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातील इतर जे घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा  प्रचंड संख्येने एक वर्ग आहे आणि त्यामुळे न भिता या सगळ्याला, जे गेलंय जे झालंय ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो. आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळ्यांनी करू एवढच या ठिकाणी सांगतो", असे पवार म्हणाले. 

Web Title: Santosh Deshmukh murder case: Will not sit still until the mastermind is properly punished says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.